सत्यमेव जयते!

तरुण भारत लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२३ । स्वत:स सिद्ध करण्यासाठी सत्यालाही कठोर सत्त्वपरीक्षा द्यावी लागते, असे म्हणतात. अशा सत्त्वपरीक्षेचे अनेक फेरे पार पाडल्यानंतर सत्य सिद्ध होते. म्हणूनच, सत्य परेशान होऊ शकते पण पराजित नाही,  असे म्हटले जाते. गेल्या काही दिवसांत सत्याची नवी कसोटी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या पक्षावर ज्या कुटुंबाची सत्ता मानली जाते, त्या पवार कुटुंबाच्या नव्या पिढीतील आमदार रोहित पवार यांनी याची जाणीव समाजमाध्यमावरील एका ट्विटद्वारे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना करून दिली आणि सत्याचा विजय होईल, अशी आशादेखील व्यक्त केली. खरे म्हणजे, सत्याचा विजय होईल हा तेजस्वी यादव किंवा सध्या जे कोणी राजकीय नेते वेगवेगळ्या चौकशांच्या फेऱ्यात अडकले आहेत, त्या सर्वांसाठीच दिलाशाचा शब्द आहे की धडकी भरविणारा शब्द आहे, याबाबत मतांतरे असू शकतात. सत्याचा विजय Satyamev Jayate होईल असे रोहित पवार यांनी तेजस्वी यादव यांना सांगितल्यावर, तेजस्वी यादव यांना दिलासा मिळाला असेल किंवा नेमके काय वाटले असेल ते सांगता येणे अंमळ अवघडच आहे.

एखादे संकट जेव्हा समोर उभे राहते तेव्हा ते ज्यांच्यावर कोसळण्याची अधिक शक्यता असते ते सारेजण एकत्र येऊन संकटाचा सामना करतात, असे सांगणारे एक संस्कृत वचन आहे. सध्या अंमलबजावणी संचालनालय, आयकर खाते, केंद्रीय तपास यंत्रणा आदी यंत्रणांमार्फत देशाच्या वेगवेगळ्या भागांत अनेक राजकीय नेत्यांच्या मालमत्तांवर धाडसत्रे सुरू असून प्रचंड मोठ्या प्रमाणात बेहिशेबी व्यवहार चव्हाट्यावर येऊ लागले असल्याने, Satyamev Jayate संकटाच्या सावटाखाली धास्तावलेले सारेजण एकत्र येऊन या संकटाचा मुकाबला करण्याची तयारी करू लागले आहेत. गेल्याच आठवड्यात देशातील नऊ प्रमुख विरोधी नेत्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांनाच खरमरीत किंवा असेच काही म्हणावे अशा भाषेत पत्र लिहून या कारवायांबाबत चिंता व्यक्त केली. अशा कारवायांमुळे लोकशाही संकटात येत असून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याने हुकूमशाही वगैरे अस्तित्वात येईल, अशी भीती या नेत्यांनी या पत्रातून व्यक्त केली.

माध्यमांनी या पत्राची प्रामाणिक दखल घेऊन विरोधकांचा आवाज जनतेपर्यंत पोहोचविलादेखील; पण तोच आवाज सरकारपर्यंत पोहोचण्याआधीच या तपास यंत्रणांनी बिहारचे आधुनिक सर्वेसर्वा राजघराणे मानले जाणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबालाच चौकशीच्या फेऱ्यात ओढले. Satyamev Jayate लगेचच, लोकशाही मजबूत करण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांच्या वाटेवर काटे निर्माण केले जात असल्याची आवई उठली आणि लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवरील कारवाईतून उघड झालेल्या मालमत्तांचा तपशील समोर आला. लोकशाहीसाठी तथाकथित संघर्ष करणाऱ्या कुटुंबाकडे एवढी अफाट संपत्ती, मालमत्ता कोठून येते, हा प्रश्न आजकाल फारसा विचारला जात नाही. कारण सत्ता हेच त्यांच्या संपत्तीचे साधन असते, यावर अशा काही कुटुंबांनीच शिक्कामोर्तब करून ठेवले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष, बिहारचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि आर्थिक घोटाळ्याच्या आरोपावरून अगोदरच बदनाम झालेले लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्तांवर शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले.

Satyamev Jayate एक कोटींच्या घरातील बेहिशेबी रोकड, गैरव्यवहारांच्या माध्यमातून गोळा केलेली ६०० कोटींची संपत्ती आणि घाम गाळून पैसा मिळविणाऱ्या सामान्य माणसाचे डोळे दिपून जातील एवढे सोने, दागदागिने या कारवाईत हाती आल्याची माहितीही या कारवाईनंतर ईडीने जाहीर केली. लालूप्रसादांचे चिरंजीव आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. Satyamev Jayate तिकडे तेलंगणाच्या राजकारणातून राष्ट्रीय राजकारणात उतरून विरोधकांचे ऐक्य घडविण्यासाठी पुढाकार घेणारे आणि विरोधकांचे ऐक्य झालेच तर पंतप्रधानपदाचा विरोधकांचा चेहरा म्हणून आपले नाव प्रकाशझोतात ठेवण्यासाठी कामाला लागलेले भारत राष्ट्र समितीचे नेते व तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्येस- के. कविता यांनाही ईडीने चौकशीच्या फेऱ्यात ओढले. भ्रष्टाचाराविरोधात संघर्षाचा नारा देऊन दिल्लीतील सत्ता काबीज केलेल्या आम आदमी पार्टीचे काही नेते भ्रष्टाचाराच्याच आरोपावरून सध्या तुरुंगाची हवा खात आहेत.

दिल्लीच्या मद्य धोरणातून मलिदा ओरपल्याचा आरोप असलेले या पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्यावरही सध्या स्वतःस सिद्ध करण्याकरिता तुरुंगात राहून संघर्ष करण्याची वेळ आली Satyamev Jayateअसून त्यांच्यापाठोपाठ याच प्रकरणातील चौकशीचा ससेमिरा के. कविता यांच्याही पाठीशी लागला आहे. गेल्या आठवड्यातील शनिवारचा संपूर्ण दिवस अशा कारवायांच्या बातम्यांनी राजकारणास हादरविणारा ठरला आणि स्वत:स सिद्ध करण्याकरिता कंबर कसण्याची वेळ आल्याची खात्री सत्यास पटली. बिहारमधील लालूप्रसाद यादव कुटुंबीय, तेलंगणातील केसीआर कन्या के. कविता, कागलचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्यापासून ते ठाकरे गटाचे अनिल परब यांचा कथित उजवा हात मानले जाणारे दापोलीतील सदानंद कदम अशा वेगवेगळ्या व्यक्तींच्या चौकशीनंतर बाहेर येणाऱ्या सत्याचाच विजय होईल यात शंका नाहीच; Satyamev Jayate पण कदाचित यामुळेच विरोधकांच्या तंबूत घबराट पसरली असावी, असे वाटण्याजोगी परिस्थिती खचितच निर्माण झाली आहे. चौकशीमध्ये सापडणाऱ्या बेहिशेबी मालमत्ता किंवा संपत्तीशी आमचा कोणताही संबंध नाही, हे छातीठोकपणे सांगून कारवाईस आव्हान देण्याऐवजी, केवळ विरोधकांनाच कारवाईचे लक्ष्य करून लोकशाही संकटात आणत असल्याचा आरोप सरकारवर केल्याने जनतेची सहानुभूती मिळेल, असा कदाचित विरोधकांचा होरा असावा. तसे होण्याची शक्यता अलीकडे पुरती मावळलेलीच असली, तरी विरोधकांस सत्ताधारी भाजपच्या विरोधात एकवटण्याचे नामी निमित्त मात्र या कारवाईतून मिळाले असल्याने त्या संधीचे तरी सोने करावे आणि किमान मतविभागणी टाळण्याचा कसबा प्रयोग तरी करता येतो का ते पाहावे. एवढे साधल्यास कारवाईच्या नावाने सुरू असलेल्या शिमग्याचे सार्थक होऊ शकते.

रेल्वेमध्ये नोकरी मिळविण्यासाठी यादव कुटुंबास जमिनी दान करा किंवा अल्प मोबदल्यात द्या, अशी एक योजना लालूप्रसाद यादव हे केंद्रात रेल्वेमंत्री असताना २००४ ते २००९ दरम्यान राबविली गेली व त्याद्वारे या कुटुंबाने अमाप माया गोळा केली, असा ईडीचा आरोप आहे. यादव कुटुंबाने अर्थातच हा आरोप फेटाळला असून विरोधकांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा प्रत्यारोप केला आहे. असे असतानाही, शनिवारच्या कारवाईनंतर ईडीच्या हाती लागलेली एक कोटींची रोकड, १ हजार ९०० अमेरिकी डॉलर्ससह हस्तगत केलेले विदेशी चलन, दीड किलो जडजवाहीर आदींच्या तपशिलाचा हिशेब यादव कुटुंबास द्यावाच लागणार आहे. या सर्व मालमत्तांची एकत्रित किंमत ६०० कोटींच्या घरात असावी, असा ईडीचा अंदाज आहे. याखेरीज, दिल्लीच्या न्यू फ्रेंडस कॉलनी परिसरात तेजस्वी यादव यांच्या नियंत्रणाखालील कंपनीच्या नावे खरेदी केलेल्या एका चार मजली बंगल्याचाही तपशील आता उघड झाला आहे. बाजारभावाने सुमारे दीडशे कोटी एवढी किंमत असलेला हा बंगला केवळ चार लाखांत खरेदी केल्याचा चक्रावून टाकणारा तपशीलही उघड झाला आहे. साडेसात लाख रुपयांत खरेदी केलेल्या जमिनीची साडेतीन कोटींमध्ये विक्री कशी झाली, यामागचे वास्तवही उजेडात येणारच आहे.

सत्यासाठी Satyamev Jayate आणि लोकशाहीसाठी संघर्ष करणाऱ्या राजघराण्यांवर लक्ष्मीचादेखील कसा वरदहस्त असतो, याची सर्वसामान्यांस चकित करणारी ही कहाणी या चौकशीतून समोर येऊ पाहात आहे. पण हा तर कहाणीचा सारांश म्हणावा लागेल. जसजशी ही कहाणी पुढे सरकेल, तसतसे याचे अनेक नवनवे पदरही उलगडू लागतील, यात शंका नाही. तसे झालेच, तर लोकशाही वाचविण्याचा गोंडस तोंडवळा घेऊन सरकारच्या विरोधात एकत्र येणाऱ्या विरोधकांस नवी काही निमित्तेही शोधावी लागतील. सत्यासाठी संघर्ष करीत असल्याचा बनावट मुखवटा आता बाजूला ठेवावा लागेल आणि सत्तेसाठी सारे काही, हेच या संघर्षाचे खरे कारण असल्याचे स्पष्ट करीत जनतेसमोर जावे लागेल. गेल्या आठ वर्षांत जेव्हा जेव्हा भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांच्या विरोधात एकत्र येण्याचा घाट विरोधकांनी घातला, तेव्हा या कारणासाठी त्यांच्या पाठीशी जनता उभी राहिलेली नाही, हे स्पष्टच झाले आहे. ज्या गरीब, शेतकरी, वंचित, शोषितांसाठी संघर्ष करीत असल्याचा कांगावा विरोधकांकडून सातत्याने केला जात असतो, त्या वर्गास अशा कारवायांमागे दडलेल्या वास्तवाचे भान असल्यामुळे या घटकांमध्ये भाजपविरोध रुजविण्याचे प्रयत्न फारसे यशस्वी झालेले नाहीत; उलट हाच वर्ग भाजपच्या पाठीशी ठामपणे उभा राहात असल्याचे दिसले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड केली जात असल्याच्या आरोपास जनतेचा पाठिंबा मिळत नाही, हेही स्पष्ट झाले आहे. अशा काही तपास यंत्रणा आहेत हे भाजप सत्तेवर येण्याआधी जनतेस ठावूकही नव्हते, असे एक वक्तव्य शरद पवार यांनी अलीकडे एकदा केले होते. ते खरेच आहे. कारण त्याआधी या यंत्रणा सक्षमपणे काम करीत नसाव्यात, असा याचा दुसरा अर्थ जनतेच्या लक्षात येऊ लागला आहे. मुळात तेव्हादेखील या यंत्रणांनी आजच्या एवढे सक्षमपणे आपले अधिकार वापरले असते, तर भ्रष्टाचाराचे पितळ फार काळ लपविणे शक्य झाले नसते.

खरे पाहिले, तर ही निव्वळ भ्रष्टाचाराविरोधातील कारवाई आहे, हे स्पष्ट आहे. आता त्याला लोकशाही मूल्यांचा, सत्याचा Satyamev Jayate वगैरे मुलामा देऊन स्वत:स साधुत्व बहाल करण्याच्या प्रयत्नांचा पर्दाफाश व्हायलाच हवा. कारण हा भ्रष्टाचाराचाच मामला आहे, हे आता लोकांसही माहीत झाले आहे. तेव्हा उगीचच बळीचा बकरा ठरल्याचा आव आणून सहानुभूती वगैरे मिळविण्याचा कांगावा न करता, कायद्यासमोर झुकावे आणि स्वत:स सिद्ध करण्यासाठी आणखी कठोर सत्त्वपरीक्षा देण्याचे सत्याचे श्रम वाचवावेत, यातच खरा शहाणपणा आहे. तसे झाले तरच, ‘सत्यमेव जयते’ या वचनावर राजकारणाचा विश्वास असल्याचे सिद्ध होईल. सत्याचा विजय व्हावा असेच वाटत असेल, तर सत्यास Satyamev Jayate सामोरे जायलाच हवे.