Savitribai Phule Jayanti 2025: शुक्रवारी सावित्रीबाई फुले जयंती, जाणून घ्या शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान

Savitribai Phule Jayanti 2025:  दरवर्षी देशभरात सावित्रीबाई फुले यांची जयंती ३ जानेवारीला मोठ्या उत्सहात साजरी केली जाते. त्यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी झाला. त्यांचे जन्मगाव हे सातारा जिल्ह्यातील नायगाव आहे. यंदा त्यांची १९४ वी जयंती साजरी केली जात आहे. महिलांसाठी शिक्षण उपलब्ध करुन देण्यात व समाज सुधारण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे.

देशातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांची ओळख आहे. त्यांनी शिक्षण आणि स्त्री मुक्ती चळवळीत प्रमुख भूमिका बजावली आहे. महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी लढा देत समाजामध्ये जागरूकता आणली.

देशातील पहिल्या महिला शिक्षिका

सावित्रीबाई फुले यांचा जन्म एका गरीब कुटुंबांत झाला होता. त्या काळात महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते. तथापि, त्यांनी त्यांच्या मार्गांतील अडचणींवर मात करत आपले शिक्षण पूर्ण केले. सामाजिक विरोध पत्करत त्यांनी शिक्षण घेतले आणि महिलांच्या शिक्षणासाठी लढा देत देशातील पहिली महिला शिक्षिका बनण्याचा मान मिळविला.

मुलींच्या पहिल्या शाळेचा प्रारंभ

पुण्यात सावित्रीबाई फुले यांनी सन १८४८  साली पती ज्योतीबा फुले यांच्या सहकार्याने भारतातील पहिली महिला शाळा सुरु केली.  या शाळेतील मुख्य उद्दिष्ट महिलांना शिक्षण देणे आणि त्यांना सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक सुधारणा प्रक्रियेत सहभागी करणे होते.

सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळे भारतीय समाजाच्या विचारसरणीमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल झाला आणि त्यांनी भारतीय महिलांच्या स्थितीत सुधारणा केली. त्यांचे कार्य आजही प्रेरणादायक आहे, आणि त्यांच्या कर्तृत्वाचा आदर्श आजच्या पिढीला घेऊन पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन करतो.

विविध आंदोलनात घेतला भाग

सावित्रीबाई फुले यांनी त्यांचे पती ज्योतिबा फुले यांच्यासमवेत अनेक सामाजिक चळवळींमध्ये भाग घेतला.समाजातील अनिष्ट चालीरीतींना त्यांनी विरोध केला. जसे सती प्रथा, विधवा स्त्रियांचे मुंडन या विरोधात त्यांनी संघर्ष केला.