तरुण भारत लाईव्ह । जळगाव : दोन हजारांची नोट बदलण्याची प्रक्रीया मंगळवारपासून राबविण्यात येत आहे. शहरातील स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या मुख्य शाखेत २ हजार रूपयांची नोट बदलून घेण्यासाठी तीन काऊंटर सुरू करण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास एक काऊंटर वाढविण्याचे नियोजन बँकेतर्फे करण्यात आलेले आहे.
कॅश काऊंटरवर एकाच दिवशी एका व्यक्तीला २ हजाराच्या १० नोटा म्हणजे २० हजार रूपये बदलून मिळणार आहे. आपल्या खात्यात २ लाखपेक्षा कमी रकमेच्या नोटा जमा करण्यासाठी दोन काऊंटर तर २ लाखापेक्षा जास्तीच्या मुल्याच्या नोटांचा भरणा करण्याकरिता एक स्वतंत्र काऊंटर उभारण्यात आले आहे. आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या नागरिकांसाठी बैठक व्यवस्थेसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
यात काही नागरिक हे बँकेचे खातेदार देखील नाहीत ते देखील आलेले होते. एकच व्यक्ती पुन्हा पुन्हा २ हजाराच्या नोटा बदलून घेण्यासाठी येत असेल त्याच्याकडून फॉर्म भरून घेण्यात येणार आहे. नोटा बदलून घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. कोणतीही व्यक्ती कोणत्याही बँकेत जाऊन नोटा बदलून घेऊ शकते. नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बदलून मिळणार आहेत. दरम्यान, २ हजार रूपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिक उत्सुक असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. एक तरूण २ हजाराच्या २० नोटा बदलून घेण्यासाठी आला होता. परंतु, एका दिवशी एका व्यक्तीला केवळ १० नोटा बदलण्याची मुभा असल्याने त्याला १० हजार मुल्य असलेल्या नोटा बदलून देण्यात आल्या.