School Bus : राज्यात शालेय व्हॅनला परवाने खुले , लवकरच अधिसूचना होणार जारी


मुंबई : राज्यातील लाखो पालकांना दिलासा देणारा निर्णय सरकारने घेतला आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी राज्य सरकारने स्कूल व्हॅन परवाने खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली असून, लवकरच याची अधिकृत अधिसूचना जारी केली जाणार आहे. शाळेच्या बसचे वाढते भाडे परवडत नसल्यामुळे अनेक पालक नाईलाजाने अनधिकृत रिक्षाने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवीत असतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे लक्षात घेऊन परिवहन विभागाने धोरणात्मक पावले उचलली आहेत.

---Advertisement---

 

परिवहन विभागाने पालक व बस संघटना प्रतिनिधी यांची बैठक घेतली होती. या बैठकीत अनधिकृत वाहनांतून विद्यार्थी वाहतूक होत असल्याचा विषय मोठयाप्रमाणात गाजला होता. देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतूकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४ ) तयार केली आहे. चारचाकी १२+१ आसनापर्यंत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे.

ही वाहने BS-VI या श्रेणीतील असतील. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा ही समावेश असणार आहे. राज्य सरकारकडून परिवहन विभागामार्फत सन २०१८ पर्यंत स्कूल व्हॅनसाठी परवाने देण्यात येत होते.

मात्र, स्कूल व्हॅन विद्यार्थी वाहतूकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्राच्या मानकानुसार राज्य सरकारने नियमावली तयार करून व्हॅन सुरू करण्याबाबतची सूचनावली प्रसिद्ध केली आहे. त्याआधारे राज्य सरकारने हे धोरणात्मक पाऊल टाकले असून या संदर्भात अधिसूचना जारी होईल, असेही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीला प्रथम प्राधान्य देतानाच सुरक्षित वाहतूकीसोबत बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी स्कूल व्हॅन धोरणाला मंजुरी देण्यात येत आहे. नव्या धोरणानुसार स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूकीचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना राज्य सरकारकडून परवाने देण्यात येतील. राज्यात अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅन चालू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---