---Advertisement---

बहिणीशी प्रेमविवाह केल्याचा राग; मेहूण्याला गाठलं अन् थेट संपवलं, शालकास कोर्टाने दिली कठोर शिक्षा

---Advertisement---

नंदुरबार : बहिणीशी प्रेमविवाह केल्याचा मनात राग धरून एकावर चाकूने वार करून ठार केल्याच्या घटनेतील आरोपीस जिल्हा न्यायालयाने जन्मठेप व ११ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी ही घटना नंदुरबारात घडली होती. जयेश दयाराम गंगावणे (वय १९, रा. नंदुरबार) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

नंदुरबारातीलच अरबाज सलीम खाटीक (वय २४) याने गंगावणे याच्या बहिणीशी घटनेच्या दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. त्यांना मुलगाही झाला. बहिणीशी प्रेमविवाह केल्याचा राग जयेश गंगावणे याच्या मनात होता. त्यावरून तो नेहमीच त्याला ठार मारण्याची धमकी देत होता. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अरबाज व त्याची आई असे जळका बाजारातून किराणा सामान घेऊन मच्छी बाजार चौकात येत होते. त्यावेळी जयेश याने अचानक येऊन अरबाजवर चाकूने वार केले. त्याच्या छातीत गंभीर वार लागल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी अरबाज याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. याबाबत जयेश गंगावणे याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तत्कालीन पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास करून संशयितास अटक केली होती. जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. जिल्हा अतिरिक्त व सत्र न्यायाधीश यांच्या कोर्टासमोर सुनावणी झाली. साक्षी, पुरावे लक्षात घेता जयेश दयाराम गंगावणे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच ११ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

सरकार पक्षातर्फे अॅड. व्ही.सी. चव्हाण यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक हेमंत मोहिते, हवालदार नितीन साबळे, पंकज बिरारे, शैलेंद्र जाधव, राजेंद्र गावित यांनी काम पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---