---Advertisement---
---Advertisement---
उत्तम काळे
(भुसावळ प्रतिनिधी) : अल्पवयीन मुला-मुलींवरील अत्याचार आणि त्यांच्या सुरक्षिततेची वाढती गरज लक्षात घेऊन शासनाने सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य सुरक्षात्मक उपाययोजना करणे बंधनकारक केले आहे. मात्र, शासनाचा हा आदेश केवळ कागदावरच राहणार असल्याचे भुसावळ तालुक्यामध्ये दिसून येत आहे.
तालुक्यात एकूण १९७ शाळा आहेत. यात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. बदलापूर येथील शाळेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रत्येक शाळेत सुरक्षाविषयक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, शाळेत कार्यरत कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करावी, तक्रार पेटी बसवावी आदी सूचना शिक्षण विभागाने शाळांना केल्या आहेत.
तालुक्यात ११४ शाळांनी बसवले सीसीटीव्ही कॅमेरे
तालुक्यातील ११४ शाळांनीच शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत, तर बहुतांश खासगी आणि सरकारी शाळांनी या गंभीर बाबीकडे डोळेझाक केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, स्कूल व्हॅनमध्येही सीसीटीव्ही बसविण्याच्या सूचना आहेत. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष होत आहे.
मग शाळांकडून डोळेझाक का ?
शासनाच्या स्पष्ट आदेशानंतरही अनेक शाळांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. शाळांचे व्यवस्थापनकडून सीसीटीव्ही बसवणे आणि त्यांची देखभाल करणे ही बाब खर्चिक असल्याचे कारण समोर येत आहे.
सीसीटीव्हीबाबत शासनाचा आदेश काय?
शाळेचे प्रवेशद्वार, बाहेर पडण्याचा मार्ग, वर्गाचे कॉरिडॉर, क्रीडांगण आणि आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य आहे. हे कॅमेरे २४ तास कार्यरत असावेत आणि त्यांचे फुटेज किमान ३० दिवस सुरक्षित ठेवावे, असेही निर्देश आहेत. अनधिकृत व्यक्तींना शाळेत प्रवेश न देणे, सुरक्षित कंपाउंड वॉल, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग यासारख्या उपाययोजनाही करण्याचे आदेश आहेत.
शाळा म्हणतेय, अनुदान नाही; खर्च कसा करणार?
सीसीटीव्ही बसवणे आणि त्याची देखभाल करणे हा एक मोठा खर्च आहे. शासनाने या कामासाठी कोणतेही विशेष अनुदान दिलेले नाही. केवळ आदेश देऊन शाळांवर आर्थिक बोजा वाढवला जात आहे. सरकार आणि पालकांनी या खर्चात सहभाग घेतला, तर ही अंमलबजावणी करणे सोपे जाईल, असे मत एका शिक्षकाने व्यक्त केले.
पालकांनो, हे किती दिवस सहन करणार?
शाळांमध्ये घडणाऱ्या अप्रिय घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही हे एक प्रभावी साधन आहे. सीसीटीव्ही बसवण्याबाबत मुलांच्या सुरक्षिततेसाठी किमान शाळांना जाब विचारणे ही पालकांचीही जबाबदारी नाही का? भुसावळ तालुक्यात खासगी, सरकारी मिळून १९७ शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुक्यातील १०६ खासगी शाळांनीच शासनाच्या निर्दे शानुसार आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, तर अजून ९ खासगी शाळा सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे बाकी आहे, तर शासनाच्या ८२ शाळा असून केवळ ८ शाळांवरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
- जिल्हा परिषदेने टेंडर काढले आहे. निधीही मंजूर झाला आहे. प्रोसेसमध्ये आहे. त्यामुळे लवकरच हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील.
तुषार प्रधान, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती, भुसावळ