जळगाव : जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या उन्हाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांची वेळ सकाळच्या वेळेत करावी, अशी मागणी पालकांसह विविध संघटनांकडून करण्यात आली होती. त्यानुसार सद्यःस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक तसेच माध्यमिक शाळा सकाळच्या वेळेत भरवाव्यात, असे आदेश शिक्षण संचालकांकडून देण्यात आले आहेत.
खान्देशात, विशेषतः जळगाव जिल्ह्यात एप्रिलमध्ये बहुतांश शाळांच्या परीक्षा होऊन मे महिन्यात वार्षिक निकाल जाहीर होतात, तर सीबीएससी माध्यमाच्या शाळांचे नवीन सत्र सुरू होते; परंतु यादरम्यान जिल्ह्यात तापमान वाढीची शक्यता असून, उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात सर्व शाळांची वेळ सकाळीच करावी, असे आदेश दिले आहेत.
सर्व शाळांची वेळ सकाळच्या सत्रात प्राथमिक शाळांसाठी सकाळी 7 ते 11.15 आणि माध्यमिक शाळांसाठी सकाळी 7 ते 11.45 अशी करावी, दुपार सत्रात शाळा भरवू नये, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मान्यतेने या कालावधीत शाळांच्या वेळा बदलू शकतील, असेही आदेशात म्हटले आहे.
मैदानी खेळ वा वर्ग दुपारी घेऊ नयेत
उन्हाळ्यात दुपारच्या वेळी विद्यार्थ्यांचे मैदानी खेळ आयोजित करू नयेत. बाहेर मैदानात उन्हात वर्ग घेऊ नयेत. दुपारी उन्हात विद्यार्थ्यांनी बाहेर पडू नये. शालेय व्यवस्थापन वा प्रशासनाने विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत वर्गखोल्यांमधील पंखे सुस्थितीत असल्याची खात्री करावी. विद्यार्थ्यांना थंड पिण्याचे पाणी उपलब्धता करावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.