---Advertisement---
वॉशिंग्टन : आजपासून ७० लाख वर्षांपूर्वी ‘अर्जेटाविस मॅग्निफिसन्स’ नावाचा एक महाकाय पक्षी अस्तित्वात होता. याचा शोध शास्त्रज्ञांनी लावला. संशोधनानुसार, हा पक्षी सध्याच्या अर्जेंटिना परिसरात आढळत होता. या पक्ष्याच्या पंखांचा विस्तार तब्बल २३ फूट इतका होता.
सुमारे ७० किलो वजनाचा हा पक्षी जेव्हा जमिनीवर उभा राहायचा, तेव्हा त्याची उंची ६.५ फूट असायची. अर्जेंटाविसचे वजन खूप जास्त असल्यामुळे तो लहान पक्ष्यांप्रमाणे वारंवार पंख फडफडू शकत नव्हता. उडण्यासाठी तो ‘थर्मल सोरिंग’ तंत्राचा वापर करायचा. म्हणजेच जमिनीवरून वर येणाऱ्या गरम हवेच्या प्रवाहावर आपले विशाल पंख पसरवून तो स्वार व्हायचा. त्याच्या पंखांचे एकूण क्षेत्रफळ ९१ चौरस फूट होते. यामुळे त्याला हवेत तरंगणे सोपे जात असे. या पक्ष्यासाठी सर्वात कठीण काम म्हणजे जमिनीवरून हवेत झेप घेणे आणि पुन्हा खाली उतरणे हे होते. शास्त्रज्ञांच्या मते, उड्डाण करण्यासाठी याला ताशी किमान ४० किमी वेगाची गरज भासत असे.
हाडाच्या अवशेषावरून जीवनशैलीचा उलगडा
हवेत झेप घेण्यासाठी हा पक्षी वाऱ्याच्या दिशेने वेगाने धावायचा किंवा एखाद्या उतारावरून धावत जाऊन उड्डाण करायचा, अगदी आजच्या ग्लायडर किंवा विमानाप्रमाणे तो उड्डाण करत होता. हा आतापर्यंतचा शोधलेला सर्वात मोठा उडणारा शिकारी पक्षी मानला जात आहे. त्याच्या हाडांच्या अवशेषांवरून शास्त्रज्ञांना त्याच्या वेगाचा आणि जीवनशैलीचा उलगडा झाला आहे.









