Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात 11 विधानसभेच्या जागा आहेत. या जागांवर महायुती मधील तीनही घटक पक्षांचे उमेदवार सद्यस्थितीला विराजमान आहेत. त्यापैकी दहा जागांवर महायुतीचे आमदार आहेत. महायुतीच्या भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) या तीनही घटकपक्षांमध्ये जागावाटपाचे सूत्र काही प्रमाणात निश्चित झाले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात महायुतीच्या घटक पक्षांमधील जागावाटपाचे समीकरण जवळपास निश्चित झाले आहे. त्यावर अद्याप शिक्कामोर्तब व्हायचे असले तरी जळगाव जिल्ह्यातील अकरा जागांचे महायुतीचे सूत्र ठरले आहे. त्यानुसार भाजप व शिवसेना प्रत्येकी ५ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला (अजित पवार गट) एकमेव जागा दिली जाणार असल्याचे माहिती आहे.
भाजप : जळगाव शहर, जामनेर, भुसावळ, चाळीसगाव व रावेर शिवसेना : जळगाव ग्रामीण, पाचोरा, एरंडोल, चोपडा व मुक्ताईनगर राष्ट्रवादी कॉंग्रेस : अमळनेर
यापैकी मुक्ताईनगरच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. याठिकाणी गेल्या वेळी अपक्ष उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील विजयी झाले. मात्र, ही जागा पारंपरिकदृष्ट्या भाजपच लढवत आला असल्याने पक्षाने त्यावर दावा सांगितला आहे.तर रावेरच्या जागेबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस आग्रही आहे.अकरा मतदारसंघ असताना संघटनात्मक बांधणीसाठी अमळनेर व्यतिरिक्त आणखी एक जागा लढणे गरजेचे आहे, म्हणून रावेरच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आग्रह आहे.