---Advertisement---
सेबी यूपीआय नियम: शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे पैसे योग्य आणि नोंदणीकृत ब्रोकर किंवा इतर वित्तीय संस्थांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचतील या उद्देशाने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने मोठे पाऊल उचललं आहे. सेबीने ‘पे राईट’ ही नवीन पेमेंट सिस्टमचा प्रारंभ केला आहे. ही सिस्टम युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस अर्थात युपीआयवर आधारित आहे. यामुळे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होण्याची शक्यता असणार नाही.
‘पे राईट’ सिस्टम म्हणजे काय ?
गुंतवणूकदारांची होणारी फसवणूक लक्षात घेता त्यांची होणाऱ्या फसवणूकीपासून वाचविण्यासाठी सेबीने ‘पे राईट’ प्रणाली डिझाईन केली आहे. यात केवळ सेबी नोंदणीकृत ब्रोकर्स, म्युचअल फंड कंपन्या तसेच इतर संबंधित संस्थांनाच ‘@payright’ या विशेष UPI आयडीसह पेमेंट स्वीकारण्याची परवानगी असणार आहे. ग्राहकांना बनावट आणि खऱ्या आयडीमधील फरक लक्षात यावा याकरिता ‘हिरव्या थंब्स अप’ चिन्ह दिसेल.
ते कोण वापरू शकेल?
हे हँडल सेबी नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर्स आणि म्युच्युअल फंड हाऊसेसना उपलब्ध करून दिले जाईल. या संस्थांना ब्रोकर्ससाठी abc.bkr@payrighthdfc आणि म्युच्युअल फंडांसाठी abc.mf@payrighthdfc सारखे विशेष UPI हँडल प्रदान केले जातील. हे आयडी कठोर OTP आणि SEBI पोर्टल पडताळणीनंतरच जारी केले जातील.
काय फायदा होईल?
यामुळे गुंतवणूकदारांना फसवणुकीपासून सुरक्षा मिळेल, त्यामुळे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर होण्याची शक्यता राहणार नाही. रिअल-टाइम व्हेरिफिकेशन पर्याय असेल, जेणेकरून गुंतवणूकदारांना ते योग्य खात्यात पैसे पाठवत आहेत की नाही हे लगेच कळेल. आतापर्यंत UPI द्वारे मर्यादा दररोज २ लाख रुपये होती, परंतु ‘पे राईट’ अंतर्गत ही मर्यादा ५ लाख रुपये करण्यात आली आहे.
मोठ्या रकमेसाठी हे असतील पर्याय
जर एखाद्या गुंतवणूकदाराला ५ लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे भरायचे असतील तर त्याला NEFT किंवा RTGS सारख्या इतर माध्यमांचा वापर करावा लागेल. सेबीने म्हटले आहे की या मर्यादेचा वेळोवेळी आढावा घेतला जाईल आणि गरज पडल्यास तो बदलला देखील जाऊ शकतो.
---Advertisement---
