जून महिन्यात मान्सून सरासरीपेक्षा कमी राहणार ; IMD चा दुसरा अंदाज जाहीर

मुंबई : दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतीक्षा असते. सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. याच दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मान्सून संदर्भात दुसरा अंदाज जाहीर केला असून  संपूर्ण देशात जून ते सप्टेंबर दरम्यान मान्सून सरासरी 96 टक्के कोसळण्याची शक्यता वर्तविली आहे.

मराठवाडा, विदर्भ जून महिन्यात कमी पाऊस तर संपूर्ण महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची शक्यता आहे. दीर्घ काळासाठी म्हणजे जून-सप्टेंबर महिन्यात दिलेल्या अंदाजात महाराष्ट्रात मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून (IMD) तिसरा अंदाज हा जुलै महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव बघायला मिळण्याची दाट शक्यता असल्याचे देखील भारतीय हवामान विभागाची म्हटले आहे.  यंदा मान्सून केरळमध्ये चार दिवस उशिरा दाखल होणार आहे. सध्या नैऋत्य मोसमी वारे अंदमान निकोबारजवळ आहेत. आता त्यांच्या पुढील प्रवासासाठी अनुकुल स्थिती असल्याने मोसमी वारे ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतील असे सांगण्यात आले आहे.