लखनौ : सर्वेक्षणाच्या वादातून संभलमध्ये काही आठवड्यांपूर्वी दंगल उसळली होती. या दंगलीमध्ये काही कट्टपंथीयांनी पोलीस प्रशासनाला लक्ष्य केले होते. अशातच आता या प्रकरणातील दिल्ली कनेक्शन माध्यमांच्या हाती आले आहे. संभल मध्ये हिंसाचार घडवून आणल्यानंतर दंगल घडवणारे काही समाजकंटक दिल्लीमध्ये लपून बसल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. दिल्लीच्या जामिया, ओखला, जाफराबाद, या परिसांवर पोलिस प्रशासनाची नजर आहे.
२४ नोव्हेंबर २०२४ रोजी उत्तरप्रदेश मधील संभल येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी पोलीस प्रशासनाने अनेकांना अटक केली होती. अशातच आता दिल्ली इथल्या बाटला हाऊस मधून दोघांना अटक करण्यात आली आहे. या अटकेबद्दल माध्यमांशी संवाद साधताना कृष्ण कुमार बिश्नोई म्हणाले की आम्हाला आमच्या सुत्रांकडून माहिती मिळाली की ती दोन्ही मुलं इथेच लपली आहेत. यानंतर फोटोग्राफच्या आधारे आम्ही बाटला हाऊस येथे छापेमारी करत अदनान आणि त्याच्या साथीदाराला अटक केली. अदनान आणि त्याच्या साथीदाराने आपला गुन्हा कबूल केला असून, या हिंसाचारामध्ये एकूण ५० पेक्षा जास्त समाजकंटकांना पोलिसांनी अटक केली आहे, परंतु अजूनही पोलीस प्रशासन तब्बल ३५० कट्टरपंथीयांच्या शोधात आहेत.
सध्याच्या घडीला, संभल मधील परिस्थीती नियंत्रणात आहे. शुक्रवारी नमाजाच्या वेळी लोकांनी शांततेत नमाज अदा केली होती. जामा मशिदीभोवती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.