दिल्लीत सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर…! दिल्लीतील ‘या’ स्थळांवर संभाव्य दहशतवादी हल्ल्याची माहिती

---Advertisement---

 

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसर आणि चांदणी चौकातील काही धार्मिक स्थळांवर संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली असून राजधानीत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा (एलईटी) सक्रिय झाली असून आयईडीद्वारे हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे एका मशिदीत झालेल्या आत्मघातकी स्फोटाच्या पार्श्वभूमीवर हा धोका वाढल्याचे मानले जात आहे. त्या स्फोटात ३१ जणांचा मृत्यू झाला होता, तर १६० हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट (आयएस) या संघटनेने स्वीकारली होती. आयएसच्या निवेदनानुसार, आत्मघातकी हल्लेखोराने दर्ग्यात प्रवेश करताच शिया समुदायातील लोकांच्या गर्दीत स्फोट घडवून आणला.

सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इस्लामाबादमधील घटनेचा बदला घेण्याच्या उद्देशाने एलईटी भारतात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता आहे. देशातील प्रमुख मंदिरांनाही लक्ष्य केले जाऊ शकते, अशीही भीती व्यक्त केली जात आहे. यापूर्वी गुप्तचर संस्थांनी महिनाभरापूर्वीच इशारा दिला होता की, खलिस्तानी आणि बांगलादेशस्थित दहशतवादी गट प्रजासत्ताक दिनापूर्वी म्हणजे २६ जानेवारीच्या सुमारास दिल्लीसह इतर मोठ्या शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न करू शकतात.

दरम्यान, १० नोव्हेंबर २०२५ रोजी दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोटानंतर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. त्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला होता आणि सुमारे दोन डझन नागरिक जखमी झाले होते. लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ स्फोटकांनी भरलेली कार उडाल्याने आसपासच्या अनेक वाहनांना आग लागली होती.

तपासात समोर आलेल्या डीएनए अहवालानुसार, स्फोट झालेली कार फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठाशी संबंधित डॉक्टर उमर मोहम्मद उर्फ उमर उन नबी चालवत होता. या घटनेनंतर राजधानीतील संवेदनशील ठिकाणी पोलिस आणि सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यात आली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---