तरुण भारत लाईव्ह न्युज : जळगाव तहसीलदारांनी गिरणा नदी पात्रातून जप्त केलेले ट्रॅक्टर गायब झाल्याने शनिवारी सकाळी महसूल व पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. बराच वेळ शोध घेऊनही हे ट्रॅक्टर सापडले नाही.
जळगाव तहसील प्रशासनाने जिल्हाधिकार्यांच्या आदेशास मान देत कारवाईचे सत्र सुरू केले आहे. वाळू चोरी मोठ्या प्रमाणात होत असताना कारवाई करतो आहे, असे दाखविण्यासाठी नदी पात्रात जावून शनिवारी सकाळी एक ट्रॅक्टर जप्त केले. जप्त केलेले हे ट्रॅक्टर पाळधी येथील ऍपोलो टायरच्या गोडावूनजवळ उभे केले होते. यासंदर्भात पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली होती. उभ्या केलेल्या या ट्रॅक्टर व ट्रॉलीची हवा काढण्यात आली होती. त्यामुळे पोलीस व महसुली अधिकारी तेथून निघून गेले होते. याचा फायदा उचलत काही वेळाने ट्रॅक्टरचालकाने तेथे येवून ट्रॅक्टर घेऊन तेथून पोबारा केला.
कर्मचार्यांची धावपळ
ऍपोलो टायरच्या गोडावूनजवळून हवा काढलेले ट्रॅक्टर गायब होताच पोलीस व महसूल कर्मचार्यांची मोठी धावपळ सुरू झाली. अनेक ठिकाणी शोध घेऊनही ते ट्रॅक्टर सापडले नाही. त्यामुळे ट्रॅक्टरची खरोबर हवा काढली होती की केवळ ते तसेच उभे केले होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सायंकाळपर्यंत शोध घेऊनही हे ट्रॅक्टर सापडले नाही. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती.
गिरणा पात्रातून दिवसंेंदिवस वाळू चोरीचे प्रकार सुरुच आहेत. प्रशासनातील अधिकारी कागदोपत्री कारवाई करीत असल्याचेच आता लक्षात येत असून वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.