जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अधिसभेवर व्यवस्थापन प्रतिनिधींमधून नंदकुमार बेंडाळे, संजय पाटील, निशांत रंधे, विलास जोशी हे निवडून आले तर विद्यापीठ अध्यापकांमधून प्रा. किर्ती कमलजा, प्रा. विशाल पराते, प्रा. अजय पाटील महाविद्यालयीन अध्यापकांमधून प्रा. वर्षा पाटील, प्रा. सुरेखा पालवे आणि प्राचार्यांमधून संजय सुराणा, एस.एन. भारंबे, किशोर पाटील, सुनील पाटील, वासुदेव पाटील हे निवडून आले आहेत. याशिवाय विद्यापरिषदेवर पराग नारखेडे व महेंद्र रघुवंशी हे निवडून आले.
मंगळवारी सकाळी विद्यापीठाच्या कर्मचारी भवनात विद्यापीठ प्राधिकरणाच्या मतमोजणीला प्रारंभ झाला. कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे आणि उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत मतपेट्या सिलबंद केलेली खोली उघडण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी उपस्थित उमेदवारांना निवडणूक प्रक्रिया सांगितली.
प्रारंभी विद्यापीठ शिक्षकांची मतमोजणी करण्यात आली. सकाळी ११ वाजता विद्यापीठ अध्यापक महिला गटाचा पहिला निकाल हाती आला. विद्यापीठ शिक्षकांमधून अधिसभेसाठी ३ जागा आहेत. त्यातील अनुसूचित जमाती संवर्गात ५६ पैकी ५५ मते वैध ठरली. प्रा. विशाल पराते यांना ३१ मते प्राप्त झाली तर प्रा. राजकुमार सिरसम यांना २४ मते प्राप्त झाल्यामुळे प्रा. विशाल पराते यांना विजयी घोषित करण्यात आले. महिला संवर्गात प्रा. किर्ती कमलजा यांना ३४ तर प्रा. पवित्रा पाटील यांना २१ मते प्राप्त झाली. प्रा. किर्ती कमलजा यांना विजयी घोषित करण्यात आले. खुल्या संवर्गात ३ उमेदवार होते त्यासाठी २९ मतांचा कोटा निर्धारित करण्यात आला. प्रा. अरूण इंगळे यांना २५, प्रा. अजय पाटील यांना ३१ तर डॉ. सुधीर भटकर यांना शून्य मते प्राप्त झाली. या संवर्गात प्रा. अजय पाटील हे विजयी ठरले.
व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटात खुल्या संवर्गामधून ४ जागांसाठी ६ उमेदवार रिंगणात होते. विजयासाठी १६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. सर्व ७९ मते वैध ठरली. पहिल्या नंदकुमार बेंडाळे (केसीई संस्था, जळगाव) आणि संजय पाटील (एसएसव्हीपीएस संस्था, धुळे) यांना १८ मते मिळाल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यानंतर मते हस्तांतरीत प्रक्रियेद्वारे निशांत रंधे (किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर) यांनी चौथ्या फेरीत १८ मते प्राप्त केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. तर विलास जोशी (पाचोरा तालुका को-ऑप शिक्षण संस्था, पाचोरा) यांना पाचव्या फेरी अखेर १५ मते प्राप्त झाली असली तरी विजयी घोषित करण्यात आले. व्यवस्थापन प्रतिनिधींमधून अनुसुचित जमाती या संवर्गातून भरत माणिकराव गावित (विसरवाडी शिक्षण संस्था, विसरवाडी) आणि महिला राखीवमधून दिपीका अनिल चौधरी (सोशल – कल्चरल असो. कुसुंबे, धुळे) या दोघांना बिनविरोध निवडून आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.
प्राचार्य गटातून अधिसभेवर १० जागा आहेत. पैकी महिला राखीव संवर्गातून प्राचार्य वैशाली पाटील (आर. सी. पटेल इन्स्टी. ऑफ मॅनेजमेंट, शिरपूर) आणि इतर मागासवर्ग संवर्गातून प्राचार्य सुनील पंडीत पाटील (पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक संस्थेचे फार्मसी महा. शहादा) हे बिनविरोध निवडून आले आहेत. अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त जाती/भटक्या जमाती या तीन संवर्गातील पदे रिक्त राहिली आहेत. खुल्या संवर्गात ५ जागांसाठी ७ उमेदवारी रिंगणात होते. निवडून येण्यासाठी १० मतांचा कोटा निश्चित करण्यात आला. प्राचार्य एस. एन. भारंबे (मु. जे. महाविद्यालय, जळगाव)यांना १० मते, प्राचार्य संजय सुराणा (आर. सी. पटेल इन्स्टी. ऑफ फार्मा., शिरपूर) यांना ११ मते, प्राचार्य के. बी. पाटील (कला, वाणिज्य व विज्ञान महा., सोनगीर) यांना १० मते प्राप्त झाली. या तिघांनी पहिल्या फेरीतच निर्धारित कोटा प्राप्त केल्यामुळे त्यांना विजयी घोषित करण्यात आले. तिसर्या फेरीत प्राचार्य वासुदेव पाटील (गरूड महा. शेंदुर्णी) यांना १० मते आणि प्राचार्य सुनील पाटील (कला महा. बामखेडा) यांना ८ मते पडली आणि त्यांना विजयी घोषित करण्यात आले. महाविद्यालयीन अध्यापकांमधून अधिसभेवर १० जागा आहेत. महिला राखीव संवर्गात प्रा. इंदिरा पाटील आणि प्रा. वर्षा पाटील यांच्यात लढत होती. प्रा. वर्षा पाटील या ९४६ मते घेऊन विजयी झाल्या. विमुक्त जाती / भटक्या जमाती संवर्गात एका जागेसाठी चार उमेदवार होते. यामध्ये ९४२ मते घेऊन प्रा. सुरेखा पालवे विजयी झाल्या.
विद्यापरिषदेवर वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतून दोन जागा आहेत. पैकी अनुसूचित जाती संवर्गातून प्रा. रमेश सरदार हे बिनविरोध निवडून आले आहेत. खुल्या संवर्गात प्रा. पराग नारखेडे हे विजयी झाले. मानव विज्ञान विद्याशाखेतून विद्या परिषदेवर दोन जागा निवडून द्यावयाच्या आहेत. त्यापैकी खुल्या संवर्गातून महेंद्र रघुवंशी हे ९९९ मते घेऊन विजयी झाले. विजयी उमेदवारांना कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे यावेळी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक विभाग प्रमुख इंजि. आर. आय. पाटील, डॉ.मुनाफ शेख, फुलचंद अग्रवाल तसेच विद्यापीठाचे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
प्राचार्य गटातून पराभूत उमेदवार मिलिंद बिल्दिकर यांचा हा सलग दुसरा पराभव असून चाळीसगाव येथील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदासाठी उमेदवारी दाखल केली होती. तेथे देखील त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.