स्वा. सावरकरांविषयी केलेले वादग्रस्त विधान राहुल गांधींना भोवणार

नाशिक : जाहीर सभेत स्वा.वि.दा सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नाशिक जिल्हा न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. स्वा.वि.दा सावरकर यांच्याविषयी केलेले वक्तव्य प्रथमदर्शनी बदनामीकारक असल्याचे दिसते, असे नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी दिपाली परिमल कडूसकर यांनी म्हटले आहे. याप्रकरणी शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील सुनावणीस राहुल गांधी यांना वैयक्तिकरित्या अथवा कायदेशीर प्रतिनिधीमार्फत हजर राहावे लागणार आहे.

नोव्हेंबर २०२२ मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी हिंगोली आणि अकोला येथील जाहीर सभेत आणि पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सावरकर केवळ दोन ते तीन महिनेच तुरूंगात होते. तसेच सावरकरांनी स्वतःच्याच सहकार्‍याकडून जीवनचरित्र लिहून घेतले आणि त्यामध्ये स्वातंत्र्यवीर पदवी स्वतःला देऊन घेतल्याची वादग्रस्त विधाने केली होती. सावरकर प्रेमी निर्भय फाऊंडेशनचे अध्यक्ष देवेंद्र भुतडा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात ४९९ व ५०४ कलमांर्गत गुन्हा दाखल करुन घेण्याची मागणी नाशिक जिल्हा न्यायालयात केली होती. यानुसार न्यायालयाने त्यांच्या समोर सादर केलेल्या सर्व बाबींचा विचार करुन सांगितले की, ”आरोपीने देशभक्त असलेल्या सावरकरांविरोधात केलेली विधाने मानहानीकारक असल्याचे प्रथमदर्शनी दिसते. तसेच याचिकाकर्ते देवेंद्र भुतडा यांच्या याचिकेनुसार खटला चालविण्यासाठी पुरेशी कारणे आहेत.’

सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम
स्वा. सावरकरांबद्दल राहुल गांधी यांनी केलेली विधाने प्रथमदर्शनी गुन्हेगारी आणि बदनामीकारक असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. सावरकर प्रेमींमध्ये रोष निर्माण करणारी ही विधाने आहेत. अशा वक्तव्यांनी सामाजिक शांतता बिघडू शकते. या गुन्ह्यासाठी दोन वर्ष कारावासाचे प्रावधान आहे. तसेच न्यायालय ठरवेल त्यानुसार दंड करण्यात येतो.

-ॲड. मनोज पिंगळे, याचिकाकर्त्यांचे वकिल

सावरकरप्रेमींच्या भावना दुखावल्या…
राहुल गांधी यांना सावरकरांची बदनामी करणारी माहिती पुरवली जात आहे, ती माहिती चुकीची आहे. अशा आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे समाजाच्या आणि सावरकरप्रेमींच्या भावना दुखावल्या जात आहे. अशा थोर व्यक्तिंबद्दल अभ्यास करुन बोलले पाहिजे, ही याचिका दाखल करण्यामागची भूमिका आहे.

– देवेंद्र भुतडा, याचिकाकर्ते