मोठी बातमी! जळगावातही आत्मदहनाचा प्रयत्न, घटनेमुळे खळबळ

 जळगाव : आज देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. दरम्यान, जळगावात पोलीस प्रशासनातर्फे सातत्याने होत असलेल्या त्रासामुळे गोकुळ पाटील (४२) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोकुळ पाटील हे काही दिवसांपासून पोलीस प्रशासनाच्या वागणुकीमुळे त्रस्त होते. ते अनेक दिवसांपासून न्यायालय आणि पोलीस ठाण्याच्या धावपळीमध्ये होते. यामुळे त्यांना मानसिक तणाव सहन करावा लागत होता.

पोलीस प्रशासनाच्या वर्तवणुकीवर असंतोष व्यक्त करत गोकुळ पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंधन ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. गोकुळ पाटील यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानंतर घटनास्थळी पोलीस तातडीने पोहचले असून, त्यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी गोकुळ पाटील यांच्या आत्मदहनाच्या प्रयत्नाचा तपास सुरू केला आहे.  त्यामागील कारणे समजून घेतली जात आहेत. पोलीस प्रशासनाच्या त्रासावर गोकुळ पाटील यांच्या तक्रारीसाठी काय कारवाई केली जाईल, याकडे स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.

धुळ्यात प्रजासत्ताक दिनी दोन आत्मदहनाचे प्रयत्न; काय आहे कारण?

धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन सोहळ्यादरम्यान दोन आत्मदहनाच्या प्रयत्नांनी एकच खळबळ उडवून दिली. या घटनांमुळे शहरात गोंधळ आणि तणाव निर्माण झाला, पण पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

शिरपूर येथील गोरक्षक वावड्या पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन सोहळ्यादरम्यान अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वावड्या पाटील यांनी शिरपूर शहरात होणारी अवैधरित्या गोवंशाची वाहतूक पोलिस अधिकारी पीआय के. के. पाटील थांबवत नसल्याने आरोप करत आत्मदहना प्रयत्न केला. पण त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

त्याच वेळी, धुळ्यातील जैताणे ग्रामपंचायतीतील मनमानी कारभारामुळे दुसऱ्या व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. समाधान महाले यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत जिल्हा परिषदेच्या आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा परिषद सीईओ यांच्या अंगरक्षकांनी त्यांना रोखले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, एकाच दिवशी दोन आत्मदहनाचे प्रयत्न धुळे जिल्ह्यात चांगलीच चर्चेचा विषय बनले आहे.

पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्यात आपल्या भाषणात धुळे जिल्ह्यातील विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. त्यांनी जिल्ह्यात ‘विकासाची गंगोत्री’ आणण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले आणि केंद्र शासनाचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त असलेल्या चैत्राम पवार यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, आजच्या या घटनांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, परंतु पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, एकाच दिवशी दोन आत्मदहनाचे प्रयत्न धुळे जिल्ह्यात चांगलीच चर्चेचा विषय बनले आहे.