जादा दराने कापूस बियाणे विक्री करणे भोवले ; पारोळा येथे एका विक्रेत्यांवर गुन्हा दाखल

जळगाव : पारोळा तालुक्यातील बियाणे विक्रेता मे.गायत्री ऍग्रो एजन्सी, पारोळा यांनी में.तुलसी सिडस् या कापुस उतपादकाचे कापूस तुलसी १४४(कबड्डी) बियाणे जादा दराने विक्री करत असल्याची गोपनीय माहिती २६ मे रोजी कृषी विभागाच्या भरारी पथकास मिळाली.  यानुसार पथकाने डमी ग्राहक पाठवून पडताळणी केली असता त्यात सत्यता आढळल्याने विक्रेत्याविरोधात पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पथकाने अशी केली कारवाई

विभागीय कृषी सहसंचालक नाशिक विभाग मोहन वाघ, जळगाव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सुरज जगताप  यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरारी पथकाने डमी ग्राहक यांना मे.गायत्री एग्रो एजन्सीजवर कापूस बियाणे खरेदी करण्यासाठी पाठवले असता बियाणे विक्रेते यांनी रक्कम रुपये ८६४/- चे तुलसी सीड्स यांनी उत्पादित केलेले तुलसी- 144 (कबड्डी) हा वाण रक्कम रुपये १२००/- किमतीस शेतकऱ्यास विक्री करताना रंगे हात पकडले.

या घटनेच्या अनुषंगाने सोमवार २७ मे रोजी पोलीस स्टेशन पारोळा येथे गु. र न.१६९/२०२४ अन्वये जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांनी गुन्हा दाखल केला आहे.  या कारवाईसाठी उपविभागीय कृषी अधिकारी अमळनेर सी. डी. साठे, विभागीय नियंत्रण निरीक्षक नितेंद्र पानपाटील, मोहीम अधिकारी विजय पवार, कृषी अधिकारी पंचायत समिती पारोळा दिनेश कोते व कृषी सहायक रोहित शिंदे यांनी परिश्रम घेतले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बाळू गीते करीत आहेत.

शेतकऱ्यांना आवाहन 

या कारवाईच्या अनुषंगाने विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी नाशिक विभागातील सर्व शेतकरी बंधूंना आवाहन केले आहे की कोणीही जादा दराने बियाणे खरेदी करू नये, बियाणे अधिकृत विक्रेत्याकडून खरेदी करताना पक्की पावती मागावी. बियाणे खरेदी करताना कुणालाही अडचण असल्यास कृषी विभागाकडे तात्काळ संपर्क साधावा.