सातत्य न राखणाऱ्या खेळाडूंना घरी बसवा

#image_title

भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात खेळताना हाराकिरी केली. १४० कोटी लोकसंख्येच्या देशातून ११ खेळाडू निवडले जातात आणि ते लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जातात, तेव्हा सामान्य क्रिकेट रसिकाला राग अनावर होतो. स्वाभाविकही आहे. खेळ म्हटला की जय-पराजय होणारच. परंतु, पराभव हा लाजिरवाणा असेल आणि खेळाडूंच्या बेफिकीर वृत्तीमुळे झालेला असेल तर तो रसिकांच्या जिव्हारी लागणार आणि त्यामुळे संतापाचाही उद्रेक होणार. हारण्यासाठीच ऑस्ट्रेलियासारख्या देशात जायचे असेल तर रोहित शर्मा, विराट कोहली यांच्यासारख्या प्रचंड मानधन घेऊन खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची गरज काय? त्यासाठी एखाद्या मोठ्या शहरातील क्लबचे खेळाडूही पाठविले जाऊ शकतात. रोहित शर्मा हा कर्णधार असूनही बॉर्डर गावस्कर चषकाच्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळला नाही. अशी जर भारतीय संघाची स्थिती असेल तर कामगिरीवर नाराज असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे.

भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर नियामक मंडळ नाराज असल्याच्या वार्ता आहेत. खेळाडूंवर प्रचंड मानधनाचा वर्षाव करणाऱ्या नियामक मंडळाने खेळाडूंसाठी कठोर अशी आचारसंहिता तयार करण्याची गरज या पराभवाने अधोरेखित केली आहे. भारतीय संघात स्थान असलेल्या खेळाडूंनी वर्षभर सराव हा केलाच पाहिजे, स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी परिश्रम घेतले पाहिजेत, देशांतर्गत स्पर्धांमध्ये गंभीरपणे सहभाग नोंदविला पाहिजे, प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्यांच्या कामगिरीच्या आधारेच त्यांची भारतीय संघात निवड व्हायला पाहिजे. संघातील खेळाडूंचा जोपर्यंत नियामक मंडळाशी करार आहे, तोपर्यंत या खेळाडूंवर काही बंधने लादणेही आवश्यक आहे. पदार्पणातच अनेक खेळाडू जाहिरातींमध्ये मॉडेल म्हणून काम करणार नाहीत, हे पहिले बंधन घालणे अत्यावश्यक आहे. जो नवीन येतो, त्याला कुठल्या ना कुठल्या कंपनीच्या जाहिरातीत काम मिळतेच मिळते. त्यामुळे अशा खेळाडूंचे खेळावरील लक्ष कमी होते आणि त्याचा परिणाम कामगिरीवर होतो. परिणामतः संघाची कामगिरीही खराब होते. या सगळ्या बाबींचा विचार करता, ज्यांना भारतीय संघात निवडले जाते आणि निवडलेल्यांची खेळण्याची तयारी असते, त्या सगळ्यांना नियमांचे पालन करण्याची सक्ती ही केलीच पाहिजे. क्रिकेटमध्ये भारतीय संघाने चांगली कामगिरी केलीच नाही, असे आम्हाला अजिबात म्हणायचे नाही.

अनेकदा ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशाच्या मजबूत संघांना पराभूत करण्याची दमदार कामगिरी भारतीय खेळाडूंनी केली आहे. त्यासाठी ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. पण, सध्याच्या संघातील काही खेळाडूंच्या कामगिरीची समीक्षा करणे गरजेचे आहे. ऋषभ पंत हा यष्टिरक्षक आहे. फलंदाजी करताना अनेकदा तो अनावश्यक फटके मारतो आणि बाद होतो. त्याच्या अशा वागण्यावर संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक यांनी नियंत्रण मिळविले पाहिजे. ताकीद देऊनही खेळाडू ऐकत नसतील तर बाहेरचा रस्ताही दाखविता आला पाहिजे. १४० कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातून सामना खेळण्यासाठी फक्त ११ खेळाडू निवडले जातात, ही बाब लक्षात घेता खेळाडूंची निवड ही निःपक्षपातीपणे झाली पाहिजे, ज्यांची योग्यता आहे, त्यांनाच निवडले पाहिजे, संधी दिल्यानंतर त्यांच्या खेळाचा आढावा नियमितपणे घेतला गेला पाहिजे आणि प्रत्येक वेळी संघाची कामगिरी तपासून पुढल्या मालिकेसाठी अनुभवी खेळाडूंसह नव्या दमाचा संघ तयार ठेवला पाहिजे. प्रचंड लोकसंख्येतून जेव्हा ११ खेळाडू निवडले जातात, तेव्हा क्रिकेट रसिकांच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा वाढलेल्या असतात. स्वाभाविकही आहे. अपेक्षा १०० टक्के पूर्ण करता येणे खेळाडूंसाठी शक्य नसले, तरी चांगला खेळ करून रसिकांना खूश करणे निश्चितच कठीण नाही. जे खेळाडू वारंवार संधी देऊनही चांगला खेळ करत नाहीत, त्यांचे लाड केले जाऊ नयेत.

आयपीएल सुरू झाल्यापासून खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतो आहे. त्यामुळे अनेक खेळाडू संपूर्ण लक्ष तिकडे केंद्रित करताना दिसतात. आयपीएलमध्ये दीर्घकाळ खेळल्याने अनेकदा ते थकून जातात आणि भारतीय संघात खेळताना त्यांची कामगिरी सुमार राहते, हेही दिसून आले आहे. सध्या भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दीर्घ अनुभव असलेले दिग्गज खेळाडू खेळत असले, तरी त्यांच्यावरील अवलंबित्व कमी करण्याच्या दृष्टीनेही क्रिकेट नियामक मंडळाला प्रयत्न करावे लागणार आहेत. अनेक पर्याय आहेत. ते पडताळून पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भारतात प्रतिभेची काहीही कमतरता नाही. अनेक स्पर्धांमधून आपल्याला चांगले खेळाडू शोधून काढता येतात. भाईभतिजावाद बाजूला सारत प्रामाणिक प्रयत्न केले गेलेत तर प्रतिभावान खेळाडू शोधून त्यांना संधी दिली जाऊ शकते.

नव्या खेळाडूंना प्रशिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणता येऊ शकते. ज्यांची एकदा संघात निवड होते, त्या सगळ्यांसाठी नियमित सराव हा सक्तीचाच असला पाहिजे. अन्यथा, नियमित व्यायामाअभावी पोलिस खात्यात जसे अनेक ढेरपोटे तयार होतात, तसे आळशी खेळाडू भारतीय संघातही दिसू शकतात. हे टाळता येणे अशक्य नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या निर्णायक पाचव्या सामन्यातील पराभवामुळे प्रतिष्ठेचा बॉर्डर गावस्कर चषक गमावण्यासह भारताचे जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले, हे फार दुर्दैवी होय. प्रतिभेची कमतरता नसलेल्या भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियात झालेला पराभव क्रिकेट रसिकांच्या जिव्हारी लागला आहे. नसता लागला तरच नवल! ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी भारताला शेवटच्या सामन्यात विजय मिळविणे अनिवार्य होते. मात्र, सिडनी येथील क्रिकेटच्या मैदानावर गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टीवर भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही, हे वास्तव आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे फलंदाज अपयशी ठरले. पंत, यशस्वी जयस्वाल यांना सातत्य राखता आले नाही. बेजबाबदार फटके मारणाऱ्या पंतला समज देणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांची मालिका ३-१ अशा फरकाने जिंकताना दशकभरानंतर बॉर्डर गावस्कर करंडक उंचावला. यासह ऑस्ट्रेलियाने ११ ते १५ जून या कालावधीत इंग्लंडमधील ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या ‘डब्ल्यूटीसी’च्या अंतिम सामन्यासाठीही पात्रता मिळविली. ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेतील गतविजेता असून, यंदा त्यांच्यासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. ‘डब्ल्यूटीसी’ मध्ये दक्षिण आफ्रिकेची गुणांची टक्केवारी ६६.६७ अशी असून ते अग्रस्थानी आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ ६३.७३ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी आहे. सिडनीतील पराभवामुळे भारतीय संघाचे गुणांकन ५० टक्क्यांवर घसरले, ही बाब मनाला वेदना देणारी आहे.

तवर्षीच्या अखेरीस मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघ ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम फेरी गाठण्यासाठी सुस्थितीत होता. मात्र, न्यूझीलंडने भारताला ०३ अशी धूळ चारली. त्यामुळे अन्य संघांच्या निकालांवर अवलंबून न राहता अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत किमान चार सामने जिंकावे लागणार होते. भारताने या मालिकेची विजयासह सुरुवात जरूर केली, पण भारतीय संघातील खेळाडूंना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. भारतीय संघाने पुढील चारपैकी तीन सामने गमावले, तर एक सामना अनिर्णीत राहिला होता. त्यामुळे सलग तिसऱ्यांदा ‘डब्ल्यूटीसी’ची अंतिम फेरी गाठण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अधुरेच राहिले. गेल्या दोन पर्वांत भारताला अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता जूनमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेने भारतीय संघ ‘डब्ल्यूटीसी’च्या नव्या पर्वाला सुरुवात करेल, तेव्हा संघात दमदार, सातत्य राखू शकतील अशाच खेळाडूंचा समावेश करण्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भर द्यावा, असा क्रिकेट रसिकांचा असलेला आग्रह अनाठायी नाहीच!’