जळगाव : नाशिक विभागांतर्गत जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात 3 मेपासून निवडणूक आयोगाच्या सूचना, निर्देशानुसार होम वोटिंगला सुरुवात करण्यात आली. यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील सुशीला निंबा राणे. सावदा ता.रावेर यांनी प्रशासनाने उपलब्ध करून दिलेल्या होम वोटींग सुविधेंतर्गत मतदान केले. रावेर लोकसभेतून मतदान करणाऱ्या सुशीला राणे या पहिल्या मतदार ठरल्या आहेत.
मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रांतर्गत ज्येष्ठ, रूग्ण नागरिकांसह दिव्यांग अशा 55 मतदारांचे होम वोटींग सुविधाव्दारा मतदान होणे अपेक्षीत होते. त्यापैकी 52 मतदारांनी घर बसल्या आपला मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत बोलताना ते म्हणाले कि, 18 वर्षे वयोगटावरील प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचना, निर्देशानुसार एकही मतदार मतदानापासून वंचीत राहू नये. यासाठी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर 40 टक्याच्यावर दिव्यांग, 85 पेक्षा अधिक वय असलेले ज्येष्ठ नागरिक, तसेच गंभीर आजारामुळे अंथरूणाला खिळून असलेल्या मतदारांना जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे घरपोच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या विशेष मोहिमेला 3 मे पासून सुरुवात करण्यात आली असून मुक्ताईनगर तालुक्यात पहिल्या दिवशी घरी बसून सर्वप्रथम सुशीला निंबा राणे यांनी लोकसभेसाठी मतदानाचा हक्क बजावला. तसेच शंकर दामू राऊत, रुपाली जगन्नाथ कोलते.सालबर्डी ता. मुक्ताईनगर या दिव्यांग महिला मतदारांनी त्यांच्या घरी आलेल्या प्रशासन अधिकाऱ्यांच्या पथकाच्या मदतीने मतदानाचा हक्क बजावला.
रविवारपर्यंत चालणार होम वोटींग मोहिम
घरी बसून मतदान करणाऱ्यासाठी मतदाराच्या घरीच छोटेसे मतदान केंद्र उभारण्यात येते व मतदान केंद्रावर ज्या प्रमाणे प्रक्रिया पार पाडली जाते तशीच प्रक्रिया होम वोटिंग च्या दरम्यान पार पाडली जात असून जिल्ह्यात दोनही लोकसभा मतदार संघात होम वोटिंग मोहीम 3, ते 5 मे अशी रोजी राबविण्यात येत आहे. होम वोटिंग मोहिमेदरम्यान आचार संहिता व भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे कोठेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना या पथकाला देण्यात आल्या आहेत.
आयुष प्रसाद. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव.
यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, महसूल उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आदी अधिकारी उपस्थित होते.