---Advertisement---
चिखली : मूळचे चिखली येथील व सध्या दिल्लीत वास्तव्यास असलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक लक्ष्मीनारायण भाला ऊर्फ ‘लक्खीदा’ यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त झाला आहे. लंडन येथे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायाधीश परिषदेतर्फे २०२५ चा ‘राष्ट्रीय कायदा दिन पुरस्कार’ तसेच ‘जागतिक शांततेसाठीचा विशेष पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे.
थायलंडची राजधानी बँकॉक येथे २० डिसेंबरला पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय समारंभात लक्खीदांनी हे दोन्ही पुरस्कार स्वीकारले.
समाज घडविणे, शिक्षण, सेवा कार्य, राष्ट्रजागरण तसेच वैचारिक प्रबोधनाच्या क्षेत्रात ५८ वर्षे अविरत कार्य केल्याबद्दल आणि भारतीय संविधान या विषयावर लिहिलेल्या दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांमुळे त्यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात आला. दरम्यान, नुकतेच ६ व ७डिसेंबर रोजी चिखली येथे पार पडलेल्या सहस्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमात या पुरस्कारांची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.
या वेळी आंतरराष्ट्रीय न्यायाधीश परिषदेचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील अदिशचंद्र अग्रवाल यांनी व्यासपीठावरून लक्खीदांच्या कार्याचा गौरव करीत पुरस्कार जाहीर केला होता. हा सन्मान भाला कुटुंबीयांसह चिखली वासीयांसाठी, बुलढाणा जिल्ह्यासाठी आणि देशासाठी अभिमानास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे.









