जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून रेशन दुकानावरील वितरण प्रणालीचे सर्व्हर डाऊनमुळे वारंवार अडथळे निर्माण झाले आहेत. यामुळे अंत्योदय, प्राधान्यक्रम तसेच अन्य शेवटच्या टप्प्यात धान्य वितरणाचे लाभार्थी स्वस्तधान्य लाभापासून वंचित आहेत. सर्व्हर डाऊनमुळे बोटाचे ठसे लिंक होत नसल्याने लाभार्थी शिधापत्रिकाधारक वारंवार ये-जा करीत धान्य लाभासाठी ताटकळले असल्याचे दिसून आले आहे.
स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थीची केवायसीसाठी गर्दी
जिल्ह्यात सद्यःस्थितीत स्वस्त धान्य रेशन दुकानदारांकडून लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना केवायसी करून घेण्याविषयी आवाहन केले जात आहे. यात शिधापत्रिकेवर असलेल्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड झेरॉक्स व रेशनकार्डची झेरॉक्स तसेच कुटुंबातील सदस्यांचा अंगठा घेत पडताळणी करून केवायसी केले जात आहे. शिधापत्रिकेवरील कुटुंबातील सदस्य जर बाहेरगावी असेल तर अपवादात्मक स्थितीत त्या ठिकाणच्या रेशनदुकानदाराकडे केवायसी करून देण्याविषयी सांगितले जात आहे.
सर्व्हर डाऊन अथवा लिंक नसल्याने अडथळे, धान्य लाभापासून वंचित
जिल्ह्यात राज्य स्तरावरून जाहीर झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेण्सासाठी तालुका स्तरावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यातच स्वस्त धान्य लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना केवायसी करून घेण्यासाठी स्वस्त धान्य दुकानावर शिधा पत्रिकेवर असलेल्या लाभार्थीना बऱ्याच वेळा दिवस दिवसभर ताटकळत बसावे लागत असून काही लाभार्थीना स्वस्त धान्याचादेखील लाभ मिळालेला नसल्याचे दिसून आले आहे.
प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना गहू आणि तांदूळ असा स्वस्त व मोफत धान्य लाभ दिला जातो. तसेच शुभ्र शिधापत्रिकाधारक संख्यादेखील १० हजारांहून अधिक आहे. शुभ्र शिधापत्रिकांना कोणताही लाभ दिला जात नाही.
– संजय गायकवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव