तरुण भारत लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२२ । नंदुरबार शहर व परिसरातून चोरीस गेलेल्या मोटारसायकलींचा तपास करताना तब्बल २ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या ७ दुचाकी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गवसल्या आहेत. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
निलेश हसीराम कोकणी (वय २२ रा. झामट्यावड ता.नवापूर) व राकेश दिलवर कोकणी (वय २१ रा.बिजादेवी ता.नवापूर) असे अटकेतील आरोपींचे नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना दि. ३ डिसेंबर रोजी नंदुरबार शहरात नवापूर चौफुली परीसरात दोन इसम कागदपत्र नसलेले मोटरसायकल कमी किंमतीत विकत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना चौकशीचे आदेश दिले. श्री.खेडकर यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे १ पथक रवाना केले असता नवापूर चौफुली परीसरात दोन्ही संशयीत मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सदरची मोटार सायकल सुमारे २० ते २५ दिवसापूर्वी शहरातील जिल्हा रुग्णालय परिसर येथून रात्रीच्यावेळी चोरी केल्याचे सांगितले. नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दरम्यान, आरोपी राकेश दिलवर कोकणी याच्याविरुध्द यापूर्वी देखील मोटार सायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील एका गावातून दुचाकी चोरी केल्या असून चोरलेल्या दुचाकी शेतात ठेवल्याचे सांगितले. आरोपी निलेश कोकणी याने गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील व्यारा, वालोद व सुरत जिल्हा येथून चोरी केल्याचे सांगून चोरी केलेल्या पाच मोटार सायकल त्याने त्याच्या घराच्या मागील बाजूस ठेवलेल्या आहेत, असे सांगितले. त्यानुसार २ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या एकुण ७ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून गुजरात राज्यातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस करण्यात आलेले आहेत व आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यांनी कारवाई केली
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश तांबे, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, सहा.पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार राकेश वसावे, पोलीस नाईक राकेश मोरे, मनोज नाईक, मोहन ढमढेरे, पोलीस अंमलदार अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने कारवाई केली.