जळगाव : जिल्ह्यात सद्यस्थितीत गेल्या आठ दहा दिवसापासून ढगाळ वातावरणासह बेमोसमी पाऊस होत आहे. दोन ते दिवसात सरासरी 45 मिलीमिटर पाऊय झाला असून मे महिन्याच्या चौथ्या टप्प्यात अजूनही गिरणा प्रकल्पातून आवर्तन सोडण्यात आलेले नाही. परिणामी जिल्ह्यात गिरणा प्रकल्पावर अवलंबून असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनांपरिसरात तीव्र पाणीटंचाई जाणवून येत आहे. या पाणीटंचाई निवारणासाठी जिल्ह्यात सद्यस्थितीत 15 गावांमध्ये 18 टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात गिरणा प्रकल्पावर भडगाव, पाचोरा, चाळीसगाव तसेच अन्य तालुक्यातील ग्रामीण पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. तसेच हतनूर प्रकल्पावर अमळनेर चोपडा, धरणगाव, एरंडोल आदी शहरांसह अन्य ग्रामीण पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. हतनूर प्रकल्पातून गेल्या सप्ताहात चौथे पेयजलासाठीचे आवर्तन सोडण्यात आले होते. त्यामुळे पूर्व तसेच उत्तर भागातील बऱ्याच तालुक्यासह ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना आधार झाला आहे.
गिरणा प्रकल्पांतर्गत चौथे आवर्तन मे महिन्याच्या दुसऱ्या वा तिसऱ्या सप्ताहात सोडणे अपेक्षीत होते. परंतु आरक्षीत पाणीसाठा अत्यंत कमी असल्याने तसेच आगामी पर्जन्यकाळात किमान दोन अडीच महिने तरी उपलब्ध पाणीपुरवठा पुरविणे आवश्यक आहे.
त्यामुळे आवर्तन शक्य तितके दिवस लांबणीवर टाकता येईल या दृष्टिकोनातून गिरणा प्रकल्पातून अद्याप पेयजलाचे आरक्षीत बिगर सिंचनाचे चौथे आवर्तन सोडण्यात आलेले नाही. परंतु मे महिन्यातील उन्हाची दाहकता व विहिरींनी गाठलेला तळाची स्थितीमुळे जिल्ह्यात गिरणा पट्टयात पाणी टंचाई जाणवून येत आहे.
यामुळे गत सप्ताहात 13 मे दरम्यान 13 गावांसाठी 15 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. तर सद्यस्थितीत 22 मे दरम्यान टँकरच्या मागणीत वाढ झाली असून 15 गावांसाठी 18 टँकर अशी वाढ झाली आहे.
यात सर्वात जास्त चाळीसगाव 6 गावे 6 टँकर, अमळनेर 4 गावे 6 टँकर, भुसावळ 2 गावे 2 टँकर, पाचोरा 1 गाव 2 टँकर, जामनेर 1 गाव 1 टँकर असे 15 गावांसाठी 18 टँकरव्दारे पाणीपुरवठा आहे. तसेच जामनेर 8 गावे 9 विहीरी, एरंडोल 1गाव 1 विहीर, मुक्ताईनगर 8 गावे 8 विहीरी, बोदवड 1 गाव 1 विहिर, चाळीसगाव 11 गावे 11 विहिरी, अमळनेर 9 गावे 9 विहिरी, पारोळा 7गावे 7 विहीरी, चोपडा 3 गावे 4 विहिरी असे एकूण 52 गावांसाठी 54 विहीरींचे अधीग्रहण करण्यात आले आहे. तसेच जळगाव तालुक्यात एका गावासाठी नवीन विंधन विहीरीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.
टंचाईग्रस्त गावे व टँकर – अमळनेर- डांगर बुद्रुक, तळवाडे, सबगव्हाण, जानवे, भडगाव-तळबंद तांडा, जामनेर- वाडी किल्ला, चाळीसगाव- पिंपळगाव, राजदेहरे गावठाण तांडा, कृष्णानगर, अंधारी, हातगाव विसापूर तांडा व भिल्लवस्ती, भुसावळ- कंडारी, कुऱ्हे प्र.न.महादेव माळ, पाचोरा – लोहारा असे टँकर सुरू आहेत.