नर्सिंग विद्यार्थिनीचा लैंगिक छळ, मृत्यूदंडाची मागणी करत परिचारिका उतरल्या रस्त्यावर

रत्नागिरी : येथे एका नर्सिंग विद्यार्थिनीचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली आहे. सध्या तीच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीच्या अंगावर जखमाही आढळल्या. या घटनेनंतर नर्सिंगच्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याचा निषेध करत परिचारिकांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नागिरीतील चंपक मैदानात नर्सिंगची विद्यार्थिनी बेशुद्धावस्थेत आढळली. पोलिसांनी मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर रत्नागिरीतील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त जमावाने एकच गोंधळ घातला.

या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर (सिव्हिल हॉस्पिटल) आंदोलनही केले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत दोन्ही बाजूने जैस्तंभ आणि मारुती मंदिराकडे जाणारी वाहतूक रोखून धरली.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात

उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईणकर आणि शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी संतप्त जमावाशी चर्चा करून तपासासाठी थोडा वेळ देण्यास सांगितले. तरुणीच्या जबानीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, ते तपासात वापरले जाणार आहेत. लवकरच आरोपींना पकडले जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.