तरुण भारत लाईव्ह । रवींद्र गणेश सासमकर । विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेत बोलतांना ‘छत्रपति शंभुराजे हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते’ असे विधाने केले. या विधानावरुन महाराष्ट्रभर गदारोळ उठवला. वास्तविक धर्मवीर हा शब्द स्वराज्यरक्षक या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द नव्हे. तरीही मतांच्या राजकारणासाठी राजकीय नेते आणि स्वघोषित इतिहासकार सतत महापुरुषांविषयी चुकीची मांडणी करत असतात. तात्कालिक राजकारणासाठी आपण भावी पिढीचे मोठे नुकसान करत आहोत, याचेही भान राजकारण्यांना राहत नाही.
छत्रपति शंभुराजांच्या नऊ वर्षातील कारकीर्दीत त्यांनी हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले, त्याचप्रमाणे धार्मिक सत्कृत्ये केली, त्यामुळे त्यांना स्वराज्यरक्षक म्हटले जाते तसे धर्मवीरही म्हटले जाते. शंभुराजांना धर्मवीर का म्हणावे, याची काही उदाहरणे बघितली तर त्यांची उपाधी आपल्याला सार्थ वाटू लागते.
मिर्झाराजा जयसिंगाचा मुलगा रामसिंग याला लिहीलेल्या संस्कृत पत्रात (नोव्हेंबर,1682) शंभुराजांचा जाज्वल्य धर्माभिमान व्यक्त झाला आहे. शंभुराजे लिहीतात “त्या यवनाधमाला (औरंगजेबाला) सांप्रत असे वाटू लागले आहे की, आम्ही हिंदु सत्वशून्य आहोत. आम्हाला धर्माचा काहीही अभिमान राहिलेला नाही. बादशहाची वागणुक यापुढे आम्हाला सहन होणार नाही” पुढे शंभूराजे या पत्रात लिहीतात “आता अशी वेळ आली आहे की, त्या यवनाधमाला (औरंगजेबाला) पकडून कारागृहात घालणे शक्य होईल. मग आपल्या देवतांची पुन्हा स्थापना करुन धर्मकर्मे निर्विघ्नपणे पार पडतील, अशी व्यवस्था करता येईल. हे सारे लवकर करावयाचे आम्ही ठरविले आहे याची आपण खात्री बाळगावी.” या पत्रातुन शंभुराजांचा हिंदुधर्माभिमान, देशधर्मासाठी सर्वस्व पणाला लावण्याचा निर्धार आणि खुद्द औरंगजेब बादशाहाला कारागृहात टाकण्याची महत्वाकांक्षा यांचे दर्शन होते.
शंभुराजांनी फोंड्याचा देशाधिकारी धर्माजी नागनाथ याला दि. 22 मार्च 1688 ला कळविले की, अंत्रुज येथे मुस्लिम राज्यात अंगभाडे कर घेत नव्हते, त्यावेळी लोक सुखी होते. आता हिंदूराज्य झाल्यावर तो कर चालु आहे तरी तो बंद करावा. याचा एक शिलालेख हळकोळण (अंत्रुज) येथे आहे. इथे छत्रपती शंभूराजांच्या राज्याला “हिंदुराज्य” म्हटलेले आहे.
दि.11 डिसेंबर 1683 रोजी साष्टी प्रांतात मराठ्यांनी तीन हजार घोडदळ व एक हजार पायदळासह प्रवेश केला.
मडगावमध्ये दहा दिवस शंभूराजांच्या सेनेने धडाका उडवला……”किल्ल्यावरच्या ख्रिस्ती पाद्र्यांचे झगे काढून मराठ्यांनी त्यांची गावातुन धिंड काढली…. ज्या धर्मगुरुंची शंभुराजांनी धिंड काढली, त्यांच्यापाशी धर्म नव्हता आणि गुरुचे चारित्र्यही नव्हते. या धर्मगुरुंनी हिंदुना बाटवण्याचा आणि जे बाटण्यास तयार नाहीत त्यांना जिवंत जाळण्याचा व पैसे उकळण्याचा सपाटा लावला होता. या ख्रिस्ती पाद्र्यांनी जे पेरले होते तेच उगवत होते, शंभूराजांनी त्यांच्या पापाची शिक्षा त्यांना दिली होती.
छत्रपति शिवाजीमहाराज यांनी जबरदस्तीने मुसलमान केलेल्या नेतोजी पालकरांना पुन्हा हिंदु करुन घेतले तोच वारसा छत्रपति शंभुराजांनीही चालवला. हरसुलच्या गंगाधर कुलकर्णीला जबरदस्तीने मुसलमान केले होते,त्याला शंभुराजांनी पुन्हा हिंदु करुन घेतले.
मुंबईच्या गव्हर्नरने पाठविलेल्या कॅप्टन हेन्री गॅरी आणि थॉमस विलकिन्स यांनी शंभुराजांशी 1684 साली तह केला, त्या तहात एक कलम असे होते ‘That the English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians” अर्थात “इंग्रजांनी माझ्या प्रदेशातून माणसे खरेदी करु नयेत आणि त्यांना गुलाम अथवा ख्रिश्चन करु नये” तशी अटच शंभुराजांनी इंग्रजांना घातली होती.
शंभुराजे स्वत: लिहीतात,
जीवितं मृतकं मन्ये देहिनां धर्मवर्जितम् । मृतो धर्मेण संयुक्ती दीर्घिजीवी भविष्यति ॥ ६११ ॥
धर्मवीर शंभूछत्रपती विरचित बुधभूषणम् – अध्याय २ श्लोक ६११
अर्थः जो माणूस जीवंतपणी धर्म विरहित आचरण करतो तो जीवंत असूनही मेल्यासारखा असतो. आणि धर्मासाठी मरतो तो चिरंजीव, दीर्घजीवी असतो.
बाकरेशास्त्री यांना दिलेल्या दानपत्रात शंभुराजे आपल्या आजोबांचा म्हणजेच शहाजीराजांचा उल्लेख ‘हिंदुधर्मजिर्णोध्दारक’ असा करतात. अशा छत्रपती शंभूराजांना “धर्मवीर” म्हटले जाते, ते किती यथोचित आहे, याची आपल्याला प्रचिती येईल.
अजित पवार यांच्या अनैतिहासिक विधानावर महाराष्ट्रभर शिवप्रेमी जनतेने नाराजी व्यक्त केली आहे. माजी खासदार संभाजी छत्रपति यांनीही अजित पवारांवर टीका केली आहे. अजित पवार यांचे विधान अर्धसत्य असून शंभुराजे हे स्वराज्यरक्षक तसेच धर्मवीरही होते,असे संभाजीराजे म्हणाले.
अजित पवारांच्या पाठोपाठ स्वघोषित इतिहासकार इंद्रजित सावंत आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही आगीत तेल ओतण्याचे काम केले. हिंदवी स्वराज्याच्या छत्रपतिंची निर्दयी हत्या करणारा औरंगजेब हा क्रुर नव्हताच अशी मांडणी या दोघांनी केली. नेत्यांना खुश करण्यासाठी आणि मतांच्या लाचारीसाठी थेट औरंगजेबाला क्लीन चीट देऊन सावंत आणि आव्हाडांनी महाराष्ट्राच्या भळभळत्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. औरंगजेबाच्या क्रूरतेची, पक्षपाताची आणि धर्मांधतेची उदाहरणेच्या उदाहरणे त्याच्या दरबारी इतिहासात नोंद केलेली आहेत. ऐतिहासिक फारसी साहित्य खंड-6 मध्ये औरंगजेबाच्या क्रुरतेची,मंदिर विध्वंसाची आणि हिंदुच्या प्रती पक्षपाताची उदाहरणेच्या उदाहरणे सापडतील.
अजित पवार, जितेंद्र आव्हाड, सावंत आदी लोक स्वार्थासाठी दिवसरात्र फुले, शाहु आणि आंबेडकरांचा जप करतात. यापैकी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगजेबाची क्रूरताच त्यांच्या लेखनातुन मांडली आहे.
भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या Thoughts on Pakistan या मौलीक ग्रंथात सुमारे 1000 वर्षाच्या इस्लामी आक्रमणाचा आढावा घेतलेला आहे.
महाराष्ट्र शासनाने हा ग्रंथ Dr.Babasaheb Ambedkar -Writing and speeches च्या 8 व्या खंडात छापला आहे. यातील पान क्र. 59, 60 वर मुघल बादशाह शाहजहानने बनारस जिल्ह्यात 76 मंदिरे पाडल्याचा उल्लेख केला आहे.
तसेच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर पुढे औरंगजेबाचेही उदाहरण देतात.हिंदुच्या पाठशाळा आणि मंदिरे पाडण्याचा आदेश औरंगजेबाने सर्व प्रांतांच्या सुभेदारांना दिला तसेच काशी विश्वनाथ मंदिर पाडल्याचाही उल्लेख बाबासाहेबांनी केला आहे.
महाराष्ट्रातील पाळीव इतिहासकार (?) आणि मतासाठी लाचार झालेले राजकीय नेत्यांनी “औरंगजेब क्रूर नव्हता” अशी बालिश विधाने करण्यापूर्वी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे हे पुस्तक वाचायला हवे होते.
महात्मा जोतिबा फुले यांनी छत्रपति शिवाजीमहाराजांवर एक प्रदीर्घ पोवाडा लिहीला आहे. त्यात महात्मा फुले यांनी औरंगजेबाच्या पापाचा पाढाच वाचला आहे.महात्मा फुले औरंगजेबाला ‘सच्चा हरामी शैतान’ म्हणतात याची नोंद जितेंद्र आव्हाडांनी घ्यावी.
छत्रपति शंभुराजे हे धर्मवीर होते याबाबत महाराष्ट्रात कोणालाही शंका नाही. ते ‘स्वराज्यरक्षक’ होते याचाही इतिहास सर्वांना माहिती आहे. त्यामुळे स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी देशाची प्रेरणा असणार्या महापुरुषांचा आणि इतिहासाचा वापर करु नये. (लेखन हे युवा इतिहास अभ्यासक आहेत.)