सांगोला : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘माविआ’ची जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे. मात्र अजूनही काही जागावांवर तोडगा निघालेला नाही. अश्यातच ‘माविआ’तील मित्र पक्ष असलेले ‘उबाठा’ गट व शरद पवार गटात सांगोल्याच्या जागेवरून वाद सुरु झाला आहे.
शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार सांगोला या मतदारसंघासाठी शरद पवार यांचा पक्ष वेगळी भूमिका घेणार आहे. हा पक्ष शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) नेते बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देणार आहे. रोहित पवार यांनी तशी माहिती दिली आहे. त्यामुळे याच सांगोल्याच्या जागेवरून मविआत वाद होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या पक्षातील नेते दीपक आबा साळुंखे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून दीपक साळुंखे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच सांगोल्यातून ठाकरे यांच्या पक्षाचे दीपक साळुंखे हे महाविकास आघाडीचे उमेदवार होण्याची शक्यता आहे. तशी तयारीदेखील साळुंखे यांनी केली आहे. मात्र शरद पवार यांचा पक्ष या जागेसाठी शेकापचे बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.