Sharad Pawar: मोठी बातमी! शरद पवारांची प्रकृती खालावली, पुढील चार दिवसांतील दौरे रद्द

#image_title

Sharad Pawar Health Update: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संदर्भात ही बातमी आहे. शरद पवार हे सध्या पुण्यात असून त्यांची प्रकृती खालावली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. त्या दृष्टिकोनातून घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने देखील निवडणुकीच्या मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. अशात दौरे, गाठीभेटींचे सत्र सुरू असताना शरद पवार यांच्या आरोग्यासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांना बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी आपले पुढचे चार दिवसांचे दौरे रद्द केले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध सर्वच राजकीय पक्षांना लागले आहेत. त्या दृष्टिने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने देखील या निवडणुकीसाठी आपली कंबर कसली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दौरे करत आहेत. मात्र, पुढील चार दिवसांचे त्यांचे दौरे रद्द करण्यात आले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माहिती देण्यात आली आहे.

शरद पवार हे गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्या दरम्यान आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये शरद पवार यांना बोलताना अडचण होत होती. त्यानंतर आता शरद पवार यांच्या तब्येतीबाबत नवी माहिती समोर आली आहे. शरद पवार यांची प्रकृती खालावल्याची माहिती आहे. त्यामुळे त्यांचे पुढील चार दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.

आरोग्याविषयी ‘ही’ समस्या झाली निर्माण

शरद पवार यांना खोकला असल्यामुळे त्यांना बोलण्यास त्रास होत आहे. म्हणून त्यांना कार्यक्रमात भाषण करण्यास अडचण निर्माण होत आहे. या कारणास्तव त्यांचे पुढील चार दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात होणाऱ्या ध्वजारोहण समारोहाला देखील शरद पवार उपस्थित राहणार नाहीत. याठिकाणी माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीकांत शिरोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.