लोकसभा निवडणुका येत्या एप्रिलमध्ये आहेत. मात्र, राजकीय पक्षांनी पत्ते पिसायला घेतले आहेत. १८ जुलै या दिवसाने २०२४ चे राजकीय महायुद्ध कसे लढले जाईल, याचे थोडेसे ट्रेलर दाखवले. या दिवशी दोन बैठका झाल्या. भाजपच्या विरोधी पक्षांनी बंगळुरू येथे बैठक केली तर भाजपने दिल्लीत बैठक घेऊन शक्तिप्रदर्शन केले. गेल्या दोन निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यांचा भाजप आणि एनडीए जिंकत आले आहेत. मोदींचा अश्वमेधाचा घोडा रोखण्यासाठी यावेळी भाजपच्या विरोधातले तब्बल २६ विरोधी पक्ष ‘इंडिया’ या नावाने एकवटले आहेत. यूपीए आता इंडिया झाली. पंतप्रधान पदात काँग्रेसला रस नाही, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांनी जाहीर केले आहे. २६ विरुद्ध एनडीएचे ३८ असा हा सामना आहे. बंगळुरूच्या बैठकीला निघण्यापूर्वी राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांची प्रतिक्रिया बोलकी होती. पवार म्हणाले, ‘विरोधकांची एकजूट शक्य आहे; मात्र हे सोपे काम नाही.’
पवार प्रथमच मनातले बोलले. ममतादीदीने गेल्या वेळी कोलकात्यामध्ये असेच फोटोसेशन केले होते. यावेळी तरी विरोधकांची भट्टी जमेल?गेल्या म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत भाजप व मित्र पक्षांनी म्हणजे एनडीएने एकूण ५४३ जागांपैकी ३५३ जागा जिंकल्या होत्या. यात भाजपच्या ३०३ जागा होत्या. भाजपला ३७ टक्के मते मिळाली होती. एनडीएला ४५ टक्के तर बिगर एनडीएला ५५ टक्के मते मिळाली होती. तरीही ते केवळ १५० खासदार निवडून आणू शकले.काँग्रेसला तर फक्त ५२ जागांवर समाधान मानावे लागले. १० टक्के जास्त मते मिळवूनही विरोधक मागे पडले. कारण ते विखुरलेले होते. त्यामुळे यावेळी एकजूट करून भाजपला टक्कर देण्याची रणनीती आहे. एकूण ५४३ जागांपैकी किमान ४५० जागांवर सरळ लढती करवण्याची विरोधकांची रणनीती आहे. मात्र, निवडणूक जिंकण्यासाठी विश्वासार्ह असा लोकमान्य चेहरा लागतो. लोकमत लागते. विश्वासार्हता लागते. समर्पित कार्यकर्त्यांचे संघटन लागते. बंगळुरूमध्ये जमलेल्या कोणाकडे हे बळ आहे? पंतप्रधानपदाचा मार्ग उत्तरप्रदेशातून जातो. ज्याने उत्तरप्रदेश जिंकला तो भारत जिंकतो. उत्तरप्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपला ६२ जागा मिळाल्या होत्या. इंडियामध्ये बसलेल्या अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला ५ जागा जिंकता आल्या.
काँग्रेसचा तर धुव्वा उडाला. ज्या राज्याने दोन-दोन पंतप्रधान दिले तिथे काँग्रेसची दयनीय अवस्था आहे. त्यापेक्षा बसपाची जास्त ताकद आहे. बसपाने १० जागा जिंकल्या होत्या. मायावती यावेळीही इंडियाच्या कंपूत नाहीत. मायावतीच नव्हे, तर एमआयएमचे ओवेसी हे देखील इंडियामध्ये नाहीत. तब्बल ११ पक्ष वेगळे उभे आहेत आणि त्यांची मते १० टक्के आहेत. म्हणजे नाव इंडिया, पण नावात इंडिया आहे कुठे? सत्तापिपासूंचे ते कडबोळे आहे. विरोधकांनी इंडिया नाव उचलले हेच चुकीचे आहे. आपला देश या नावाने ओळखला जातो. जगात कुठेही राजकारण्यांनी देशाचे नाव उचलल्याचे उदाहरण नाही. इंडिया नावाने आपण चांगले मार्केटिंग करू शकू, मोदींची देशप्रेमी व्होट बँक फोडू, असे विरोधकांना वाटत असेल तर ते चुकत आहेत. एकजूट आहे म्हणता तर अखिलेश यादव हे काँग्रेससाठी उत्तरप्रदेशात किती जागा सोडणार आहेत? बंगालचे जागावाटप कसे असेल? बंगाल आपलेच आहे, असा ममताचा हट्ट राहिला आहे. त्या काँग्रेससाठी जागा सोडतील? मार्क्सवाद्यांना किती देतील? माक्र्सवादी आणि ममता यांचे तर साप-मुंगसाचे वैर आहे. तीच अडचण दिल्लीमध्ये येईल. दिल्ली आपलीच आहे, असा अरविंद केजरीवाल यांचा दुराग्रह राहिला आहे. काँग्रेसने नुकतेच कर्नाटक जिंकले असले तरी लोकसभेची निवडणूक होते तेव्हा मतदार वेगळा विचार करतात.तो विचार देशहिताचा असतो. त्यावेळी प्रादेशिक अस्मिता गळून पडतात. कुठल्या मुद्यांवर विरोधक मतदारांपुढे जाणार आहेत?
देश, लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो, असा विरोधकांचा युक्तिवाद आहे. पण ते म्हणतात त्यापैकी कोण धोक्यात आहे? केव्हाही नव्हती एवढी लोकशाही, एवढे स्वातंत्र्य आज आहे. म्हणूनच ‘चौकीदार चोर है’ म्हणत राहुल गांधी पाच वर्षांपूर्वी देशभर फिरले. मतदारांना ते पटले नाही तो भाग वेगळा. मग धोक्यात कोण? विरोधी पक्षांची घराणेशाही धोक्यात आहे, राहुल गांधींचा राज्याभिषेक धोक्यात आहे म्हणून त्यांना सारीच गडबड वाटते. उत्तरप्रदेशखालोखाल महाराष्ट्रात म्हणजे ४८ जागा आहेत. उत्तरप्रदेशात योगी आदित्यनाथ आहेत. योगी असताना तिकडे कोणी घुसू शकत नाही. त्यामुळे सा-यांचे टार्गेट महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातले राजकीय चित्र गोंधळाचे आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे इथले दोन्ही पक्ष फुटले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी बंड केले. अजितदादा पवार यांनी आपल्या ३५ आमदारांसह बंड पुकारले. दादांसह एकूण ९ नेत्यांनी शिंदे – फडणवीस सरकारमध्ये शपथही घेतली. ही साधी घटना नाही. महाराष्ट्राचे राजकारण एका नाजूक वळणावर आले आहे. उद्धव ठाकरे यांचे दुकान केव्हाच रस्त्यावर आले. आता महाआघाडी लंगडी झाली आहे. तरीही ठाकरे पवारांना सोडायला तयार नाहीत. अजूनही त्यांनी पवारांना ओळखलेच नाही, असे म्हणावे लागेल.
अजितदादा आणि त्यांच्या आमदारांनी दोन वेळा काकाकडे जाऊन आशीर्वाद मागितले. पण काका मुलीच्या प्रेमात आंधळा झाला आहे. सुप्रियाला पाठीशी घालणे शरद पवार सोडत नाहीत तोपर्यंत अजितदादा यांची घरवापसी शक्य नाही. पवार घराण्यातल्या संघर्षाचे मूळ सुप्रिया सुळे यांच्यात दडले आहे. Sharad Pawar and अजितदादांचे परतीचे दोर कापले गेले आहेत. माझा फोटो वापरू नका, असे शरद पवार जाहीरपणे म्हणाले. तरीही अजितदादांच्या दालनात काकांचा भला मोठा फोटो दिसतो. मात्र, निवडणुकीच्या रणधुमाळीत दादांचा विठ्ठल नरेंद्र मोदीच असतील. दादांचाच नव्हे, तर देशाचा विठ्ठल मोदीच असतील. बारामतीत यावेळी अजितदादांना मोदींचाच फोटो घेऊन फिरावे लागेल. पश्चिम महाराष्ट्रात भाजपच्या जागा वाढतील. पवारांनी एवढे उन्हाळे-पावसाळे राजकारणात काढले. त्यांना हवा समजते. तरीही त्यांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. लोकांना संभ्रमावस्थेत ठेवून स्वतः मजा घ्यायचा त्यांचा स्वभाव आजही कायम आहे. सोनिया गांधींना का सोडले आणि पुढे का धरले याचे उत्तर द्यावेसे त्यांना वाटत नाही. पवारांनी आतापर्यंत खूप कोलांटउड्या मारल्या आहेत. ते काहीही करू शकतात आणि काहीही करतील. २०२४ च्या निकालानंतर पवारांनी तंबू बदलला तर आश्चर्य वाटायला नको.
प्रॉब्लेम उद्धव ठाकरेंचा आहे. इंडियासाठी ठाकरेंनी सुचवलेली ‘जितेगा भारत’ ही टॅगलाईन विरोधी पक्षांनी मान्य केली. काय गंमत आहे पहा. ज्या नेत्याला आपला पक्ष सांभाळता येत नाही तो देश जिंकण्याच्या गोष्टी करतो. इंडियामध्ये सारे असेच उद्धव आहेत. जागावाटप होऊ द्या. मग पहा, या इंडियाच्या कशा चिंधीड्या उडतात. ही मंडळी आपला पंतप्रधानपदाचा चेहरा कोण, हे सांगू शकत नाही. सांगितला तर मारामा-या सुरू. कारण सर्वांनाच पंतप्रधान व्हायचे आहे. काँग्रेस म्हणते, आम्हाला रस नाही. निवडणुकीचा निकाल काँग्रेसला आधीच कळला, असे मानायचे का? खरी गंमत प्रचाराच्या रणधुमाळीत येणार आहे. पूर्ण देशभर फिरू शकेल असा एकही लोकप्रिय चेहरा यांच्याकडे नाही. ममता, नितीशकुमार, केजरीवाल यांना त्यांच्या राज्याबाहेर कोण ओळखते? राहुल गांधी, प्रियांका गेल्या दोन निवडणुका फिरले, मात्र फेल झाले. फिरायला या इंडियाकडे नेता आहे कुठे? देशाला एकच नेता आहे आणि त्याचे नाव म्हणजे नरेंद्र मोदी. हा विश्वास इकडेच आहे असे नाही. निवडणूक लागणार असताना जगातील अनेक देश भारताशी करार करायला उत्सुक आहेत. याचा अर्थ त्यांनाही ‘आयेगा तो मोदीही’ हे ठाऊक आहे.
– मोरेश्वर बडगे