‘शरद पवारजी तुम्ही इतके हिंदू द्वेष्टे का ?’, जळगावमध्ये महायुती आक्रमक

जळगाव : वाशी येथे आयोजित संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्यावर टिका केली.  याप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती अशी ज्येष्ठ मंडळी उपस्थित होती. यांच्यासमोरच महाराव यांनी ही टिका केल्याने जळगावात महायुतीतर्फे ‘शरद पवारजी तुम्ही इतके हिंदू द्वेष्टे का ?’, असा प्रश्न उपस्थित करत आंदोलन करण्यात आले.

जळगावात भाजपा कार्यालय जीएम फाउंडेशन येथे गुरुवारी टाळ मृदुंगाच्या तालावर याचा निषेध आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी  प्रभू श्रीरामाचे पूजन व आरती करण्यात आली.  राजकारण करत असताना धर्माच्या विषयात हस्तक्षेप करू नये,  असा इशारा देण्यात आला.

याप्रसंगी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार निषेधाचे फलक हातात घेत शरद पवारजी तुम्ही इतके हिंदू द्वेष्टे का ? असा प्रश्न विचारत जोरदार आंदोलन केले. या आंदोलनात ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. महाराव यांनी संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यक्रमात प्रभू श्रीराम आणि स्वामी समर्थ यांच्यावर टीका केली होती. या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती उपस्थित होते, परंतु, त्यांनी त्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, ज्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये असंतोष पसरला आहे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करत टाळ मृदुंग आंदोलन केले.

याप्रसंगी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे,माजी महापौर सीमा भोळे, माजी उपमहापौर सुनील खडके, भाजप माजी महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा दूध संघाचे संचालक अरविंद देशमुख, रेखा कुलकर्णी, पिंटू काळे, शिवसेना शिंदे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख श्याम कोगटा, सरिता माळी कोल्हे, शोभा चौधरी, माजी नगरसेवक गणेश सोनवणे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.