Shardiya Navratri 2024 । गुरुवारपासून शारदीय नवरात्रोत्सव ! जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व

Shardiya Navratri 2024: पचांगानुसार, आश्विन शुक्ल प्रतिपदा म्हणजेच 3 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. नवरात्रोत्सव देवी दुर्गेला समर्पित असून या काळात देवी दुर्गेच्या विविध रुपांची पूजा केली जाते. तसेच शक्तीस्वरूप दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी व्रत देखील केले जाते. मान्यतेनुसार, नवरात्रोत्सवात विधिवत पूजा आणि व्रत केल्याने देवीची कृपा होत भक्तांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद प्राप्त होतो. त्यात यंदाच्या नवरात्रोत्सास विशेष महत्त्व आहे. कारण यंदा शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे घटस्थापनेला 3 दुर्मिळ आणि शुभ योग जुळून येत आहे. चला जाणून घेऊया घटस्थापना तिथी,मुहूर्त,पूजा विधी आणि महत्व.

घटस्थापना तिथी आणि मुहूर्त

यंदा नवरात्रोत्सव गुरुवार म्हणजेच 03 ऑक्टोबर 2024 रोजी प्रारंभ होत आहे. त्यानुसार अश्विन शुक्ल प्रतिपदा तिथी 03 ऑक्टोबर 2024  रोजी 12:18 AM वाजता प्रारंभ होईल. तर 04 ऑक्टोबर 2024 रोजी पहाटे 02 वाजून 58 मिनिटांनी प्रारंभ होईल. उदयतिथीनुसार, यंदा 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्रोत्स प्रारंभ होईल.

 घटस्थापना मुहूर्त – शारदीय नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला घटस्थापना मुहूर्त सकाळी 06 वाजून 15 मिनिटे ते 07 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल. तर अभिजीत मुहूर्त सकाळी 11 वाजून 46 मिनिटे ते दुपारी 12 वाजून 33 मिनिटांपर्यंत राहील. या शुभ मुहूर्तावर तुम्ही घटस्थापना करू शकता.

जुळून येताय हे दुर्मिळ शुभ योग

ज्योतिषानुसार, यंदा शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी 3 दुर्मिळ असे शुभ योग जुळून येत आहे. पहिला शुभ योग म्हणजे इंद्र योग दिवसभर राहत दुसऱ्या दिवसी म्हणजेच 04 ऑक्टोबर रोजी पहाटे 04 वाजून 24 मिनिटांनी समाप्त होईल. तर दुसरा  शुभ योग हस्त नक्षत्राचा असून हा योग दुपारी 3 वाजून 22 मिनिटांपर्यंत असेल. यानंतर तिसरा शुभ योग चित्रा नक्षत्राचा जुळून येत आहे.

असे आहे शारदीय नवरात्रीचे महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार, वर्षभरात चार वेळा नवरात्रोत्सव साजरा केला जातो.  त्यानुसार दोन वेळा गुप्त नवरात्री तर एक चैत्र नवरात्री आणि दुसरी शारदीय नवरात्री. या चारही नवरात्रींंमध्ये शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. अश्विन मासातील शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्री सुरु होतो. या काळात देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जातात. असुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी हा चांगला कालवधी मानला जातो. दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठांनाही मोठ्या प्रमाणात भविक भेट देतात. नवरात्रोत्सव हा देवी दुर्गेच्या 9 विविध रुपांना समर्पित असून नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवसी देवी दुर्गेच्या एका रुपाची पूजा केली जाते.

नवरात्रीचा कोणता दिवस कोणत्या देवीला समर्पित

पहिली माळ-  देवी शैलपुत्री
दुसरी माळ – देवी ब्रह्मचारिणी
तिसरी माळ – देवी चंद्रघंटा
चौथी माळ – देवी कुष्मांडा
पाचवी माळ – देवी स्कंदमाता
सहावी माळ – देवी कात्यायनी
सातवी माळ – देवी कालरात्री
आठवी माळ – देवी महागौरी
नववी माळ – देवी सिद्धिदात्री

नवरात्रीला अशी करा पूजा

शारदीय नवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नानादीपासून निवृत्त व्हा. यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करत व्रताचा संकल्प करा. त्यानंतर देवघराची स्वच्छता करुन गंगाजलाने पवित्र करा. या पूजेदरम्यान एक पाट घ्या, त्यावर लाला कापड अथरुन त्यावर स्वस्तिक चिन्ह बनवा. आता रोळी आणि अक्षत यांनी तिलक लावून पाटावर देवी दुर्गेची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करा. पूजेला सुरुवात करता देवीला धूप-दीप लावून  फुले व पूजेचे साहित्य अर्पण करा.पूजेत देवीला सोळा श्रृंगाराचे साहित्य अर्पण करा. नंतर दुर्गा सप्तशती पाठ करा. शेवटी देवीची आरती करुन कळत न कळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागावी.

(टीप- या लेखात दिलेली माहिती धार्मिक मान्यतेवर आधारित आहे. tarunbharatlive या संदर्भात कुठल्याच प्रकारचा दावा करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

नवरात्रीची पौराणिक कथा
नवरात्र नक्की कसे साजरे करण्यात येऊ लागले याच्या दोन पौराणिक कथा अगदी पूर्वपरंपरागत सांगण्यात येतात. त्यातील पहिल्या पौराणिक कथेप्रमाणे महिषासुर नावाचा एक दैत्य ब्रम्हदेवाचा भक्त होता. त्याने ब्रम्हदेवांना प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान मागून घेतले. पृथ्वीवर राहणारा कोणताही मानव अथवा देव अथवा दानव यापैकी कोणीही आपल्याला मारू शकणार नाही असे वरदान त्याला ब्रम्हदेवाने दिले. पण हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुर माजला आणि त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळावर हाहाःकार माजवायला सुरूवात केली. त्याची दहशत सगळीकडे पसरू लागली. त्याचा वध करण्यासाठी ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांनी दुर्गेला साकडे घातले. नऊ दिवस दुर्गा देवीने महिषासुराशी लढून त्याचा दहाव्या दिवशी वध केला. म्हणूनच तिला ‘महिषासुर मर्दिनी’ असेही म्हणतात. यानंतरच वाईट कृत्यावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते. नऊ दिवस देवीने दिलेला लढा आणि वाईट गोष्टींंशी लढा देण्यासाठीच नवरात्रौत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असे पुराणात सांगितले जाते.

तर दुसऱ्या पौराणिक कथेनुसार, श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आणि आपल्याला रावणावर विजय मिळवता यावा यासाठी भगवती देवीची आराधना केली होती. नऊ दिवस देवीची पूजा, आराधना आणि नामस्मरण करून देवीला प्रसन्न करून घेतले होतो. त्यानंतर देवीने लंकाविजयचा आशीर्वाद दिला असे सांगण्यात येते. तर दहाव्या दिवशी रामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त केला. नवरात्र माहिती मराठीत जाणून घेणेही गरजेचे आहे.

नवरात्रौत्सवातील पूजा विधी
शारदीय नवरात्रौत्सव सहसा ऑक्टोबर महिन्यात येतो. आपल्या कुळाचाराप्रमाणे घरात घटस्थापना करण्यात येते. पहिल्या तीन दिवसात दुर्गेची पूजा करण्यात येते. ऊर्जा आणि शक्तीची देवता म्हणून दुर्गेची पूजा या दिवसांमध्ये करण्यात येते. फळं, फुलं, आरती आणि भजन स्वरूपात ही पूजा करण्यात येते. नऊ दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा करण्यात येते. तर देवीला वेगवेगळ्या नऊ रंगांचे वस्त्र नऊ दिवस परिधान करण्यात येते.

यामध्ये कुमारिका पूजन, पार्वती पूजन, सरस्वती पूजन आणि काली पूजनही करण्यात येते. पहिल्याच दिवशी एका टोपलीत माती घेऊन त्यात नऊ प्रकारचे धान्य पुरण्यात येते. दहा दिवस घटाच्या बाजूला हे ठेवण्यात येते. टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवण्यात येतो आणि त्याचीही पूजा करण्यात येते. प्रत्येक दिवशी या घटावर एक माळ चढविण्यात येते. पूजेमध्ये पाच प्रकारची फळे असतात आणि ही माळ रोज नऊ दिवस वेगवेगळी चढवली जाते. तर सकाळी संध्याकाळी धूप – दीप – आरती आणि देवीला नेवैद्य दाखवून देवीची पूजा करण्यात येते. हा दिवस सतत या घटाजवळ दिवा तेवत ठेवला जातो. कुमारिकांमध्ये दुर्गेचे रूप असते असे मानण्यात येते. नऊ कुमारिकांचे त्यांचे पाय धुऊन आणि त्यांच्या आवडीचे जेवण करून पूजन करण्यात येते. तर त्यांना भेटवस्तूही दिल्या जातात.

अनेक ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होमहवन करण्यात येतो. कोणतीही नजर लागली असेल अथवा वास्तूमध्ये कोणताही त्रास असेल तर होमहवन करून सर्व गोष्टी पवित्र करण्यासाठी पूजा करण्यात येते. तर नऊ दिवस भोंडला खेळून देवीचा जागरही केला जातो.

दरम्यान काही ठिकाणी आरती झाल्यानंतर घागर फुंकणे हा विशेष कार्यक्रमही असतो. अष्टमीला हा कार्यक्रम योजला जातो. ही घागर त्यामध्ये उदाच्या धुपाने भरली जाते आणि पाच वेळा फुंकली जाते. यामुळे श्वसनमार्ग शुद्ध होतो असे समजण्यात येते.