Share Market Closing: भारतीय शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर

शेअर बाजार : भारतीय शेअर बाजाराने आज इतिहास रचला आहे. देशांतर्गत बाजारात जागतिक गुंतवणूक वाढल्याने गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारात तेजी दिसून आली.गुंतवणूकदारांच्या जोरदार खरेदीमुळे बीएसई सेन्सेक्सने 1600 अंकांच्या उसळीसह प्रथमच 83000 चा आकडा पार करण्यात यश मिळवले आहे. निफ्टीनेही 500 हून अधिक अंकांची उसळी घेत 25,433 अंकांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला. बाजार बंद होताना बीएसई सेन्सेक्स 1440 अंकांच्या उसळीसह 82,962 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 470 अंकांच्या उसळीसह 25,389 अंकांवर बंद झाला.

भारतीय शेअर बाजारातील ऐतिहासिक तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या कमाईत मोठी मोठी भर झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध समभागांचे मार्केट कॅप 466.66 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या सत्रात 460.76 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.90 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.