---Advertisement---
---Advertisement---
नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात हृदयद्रावक घटना घडली आहे. मुलीने आईचे दूध पिणे बंद केल्याने तणावात असलेल्या भाग्यश्री वानखेडे (वय 26) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. गुरुवारी (14 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास सर्वश्रीनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली.
भाग्यश्री यांचे पती राजेश वानखेडे हे कुशन बनवण्याचे काम करतात. चार वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या भाग्यश्री यांनी नुकतेच एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. संपूर्ण घरात आनंदाचे वातावरण असताना, अचानक सव्वा महिन्यांनंतर मुलीने आईचे दूध पिणे बंद केले. यामुळे भाग्यश्री चिंतेत गेल्या.
मुलीच्या आरोग्याबद्दल चिंता वाढू लागली. ती आईच्या दुधाशिवाय राहू शकणार नाही, या विचाराने भाग्यश्री अधिकच तणावात गेल्या. मुलीच्या तब्येतीतही बिघाड जाणवू लागल्याने त्यांचे मन खचले.
हेही वाचा : धक्कादायक ! चार महिन्यांपूर्वीच मिळाली नोकरी अन् अपघातात संपले नव्या भविष्याची स्वप्ने, १ ९ वर्षीय पोस्टमास्तरचा दुर्दैवी मृत्यू
पती राजेश यांनी तिचा तणाव कमी करण्यासाठी तिला काही दिवस बहिणीकडे पाठविले. मात्र, मुलीच्या प्रकृतीची चिंता तिच्या मनातून जात नव्हती. 11 फेब्रुवारीला ती पुन्हा घरी परतली, मात्र त्यानंतरही ती सतत उदास होती.
गुरुवारी(१ ४ ) सकाळच्या सुमारास भाग्यश्री यांनी तांदूळ टिकवण्यासाठी वापरण्यात येणारे विष प्राशन केले. ही बाब लक्षात येताच, पतीने तातडीने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
पोलीस तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे.
आईच्या तणावामुळे एका कुटुंबावर काळाचा घाला ओढवला. नवजात बाळाने आईचे दूध न पिल्याने निर्माण झालेल्या तणावाने एका आईचे जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.