बांगलादेशमध्ये प्रचंड हिंसक निदर्शनं झाल्यानंतर शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांनी बांगलादेश सोडला आहे. शेख हसीना यांचे विमान उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर उतरले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांच्या विमानात इंधन भरले जाईल, त्यानंतर त्या लंडनला जाणार आहेत.
शेख हसीना त्यांच्या विमानाने भारतात उतरणार असल्याची माहिती आधीच सूत्रांकडून मिळाली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील कोणीतरी त्यांना येथे भेटण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांच्या विमानातही इंधन भरणार आहे. यानंतर शेख हसीना यांचे विमान भारतातून रवाना होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विमानाचे दुसरे इंधन भरण्याचे काम आखाती देशांमध्ये विशेषत: सौदी अरेबियामध्ये होण्याची शक्यता आहे. यानंतर शेख हसीना यांचे विमान लंडनला रवाना होण्याची शक्यता आहे.
हवाई दलाच्या उच्च सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हसीना यांचे विमान हिंडन एअरबेसवर संध्याकाळी ५:४५ वाजता उतरले. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना C-130 वाहतूक विमानातून हिंडन हवाई तळावर उतरल्या आहेत. हे विमान भारतीय हवाई दलाच्या C-17 आणि C-130J सुपर हर्क्युलस एअरक्राफ्ट हँगर्सजवळ पार्क केले जाईल. भारतीय हवाई हद्दीत प्रवेश करण्यापासून ते गाझियाबादमधील हिंडन एअरबेसपर्यंत विमानाच्या हालचालींवर भारतीय हवाई दल आणि सुरक्षा यंत्रणांकडून लक्ष ठेवले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय सुरक्षा एजन्सी बांगलादेशला लागून असलेल्या भारतीय सीमेपासून 10 किलोमीटर अंतरावर कॉल साइन AJAX1431 सह C-130 विमानावर नजर ठेवत होती. शेख हसीना आणि त्यांच्या दलातील काही सदस्य या विमानात असल्याचे सांगण्यात आले. बांगलादेश हवाई दलाचे हे विमान झारखंड आणि बिहार सारख्या राज्यांमधून उत्तर प्रदेशातील गाझियाबादला पोहोचले आहे.