ढाका : बांग्लादेशमध्ये परिस्थिती सतत बिघडत चालली आहे. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका सोडला आहे. हसिना सुरक्षित स्थळी रवाना झाल्या आहेत. दरम्यान, ढाका येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने आंदोलक दाखल झाले आहेत. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. आंदोलकांनी अनेक महत्त्वाचे रस्तेही ताब्यात घेतले आहेत. इंटरनेट पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. दरम्यान, सत्ताधारी अवामी लीगच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करत प्रमुख विरोधी पक्ष बीएनपीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.
“हिंसा सुरू झाल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी ढाका येथील त्यांचे अधिकृत निवासस्थान सोडले आहे. त्यांचा सध्याचा ठावठिकाणा अज्ञात आहे. ढाक्यातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे आणि जमावाने पंतप्रधानांचे निवासस्थान ताब्यात घेतले आहे.”
बांगलादेश मीडियाच्या वृत्तानुसार, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी दुपारी अडीच वाजता त्यांची लहान बहीण शेख रेहाना यांच्यासह लष्करी हेलिकॉप्टरमधून “सुरक्षित ठिकाणी” बंगभवन सोडले.
बांगलादेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बीएसएफने भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. बीएसएफच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बीएसएफचे डीजीही कोलकाता येथे पोहोचले आहेत.
बांगलादेशचे लष्कर प्रमुख म्हणाले, “पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. देश अंतरिम सरकार चालवेल.” लष्करप्रमुख म्हणाले, ‘आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू, तोडफोडीपासून दूर राहा. तुम्ही लोक आमच्यासोबत आलात तर आम्ही परिस्थिती बदलू. भांडणे, अराजकता आणि संघर्षापासून दूर राहा. आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांशी बोललो आहोत.
बांगलादेशात देशाच्या विविध भागांत आंदोलक आणि हसीनाच्या समर्थकांमध्ये चकमकी झाल्या आहेत. आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसले आहेत. या संघर्षांमध्ये 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी ‘विद्यार्थी भेदभावाविरुद्ध’ या बॅनरखाली आयोजित असहकार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आंदोलक आले असता हाणामारी झाली. अवामी लीग, छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाली.
दरम्यान, राजधानी ढाकासह देशभरात लष्कर तैनात करण्यात आले आहे. रस्त्यावरून पोलिसांना हटवण्यात आले आहे.