Shirpur : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे तब्बल ३३ लाख ६० हजारांचा ४८० किलो गांजा जप्त करीत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईने गांजा तस्कर हादरले आहेत. मणिलाल इसमल पावरा (लकड्या हनुमान, ता. शिरपूर) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.
शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना लकड्या हनुमान गावाच्या शिवारात संशयित मणिलाल याने गांजा लपवल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने शनिवारी पथकासह छापा टाकला. या वेळी शेतात २४ गोण्यांमध्ये तब्बल ४८० किलो गांजा मिळून आला. तो जप्त करण्यात आला. संशयिताला अटक केल्यानंतर त्याच्याविरुद्ध हवालदार सागर ठाकूर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला न्यायालयात हजर केले असता, १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
यांनी केली कारवाई
धुळे पोलीस अधीक्षक श्रीकातं धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनात शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे, मिलिंद पवार, चालक अलताफ मिर्झा, प्रकाश भिल, मुकेश पावरा, रोहिदास पवार, ग्यानसिंग पावरा, स्वप्नील बांगर, जयेश मोरे, सुनील पवार, गुन्हे शाखेचे हवालदार पवन गवळी, हवालदार आरीफ पठाण, मयूर पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली