Officer robbed at Dhule bus stand : शिरपूर मंडळाधिकाऱ्यास धुळ्यातील बसस्थानकावर धमकावत त्रिकुटाने लूटल्याची घटना बुधवार, २ एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता घडली होती. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे गुन्हे शाखेने रिक्षा चालकाला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून २१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हरीश उर्फ विजय पवार (नकाणे रोड, देवपूर, धुळे) असे अटकेतील रिक्षा चालकाचे नाव आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, अमलदार दिनेश परदेशी, पंकज खैरमोडे, संतोष हिरे, प्रशांत चौधरी, महेंद्र सपकाळ, हर्षल चौधरी, सुनील पाटील, विवेक वाघमोडे आदींच्या पथकाने केली
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे बस स्थानकावर बसच्या प्रतीक्षेत असलेले मंडळ कृषी अधिकारी शुभम संतराम शिरसाठ (शिरपूर) यांना बुधवारी (२ एप्रिल) पहाटे साडेचार वाजता २५ ते ३० वयोगटातील तिघांनी धमकावत लूटले होते. मोबाइल, पाकिटातील तीन हजार व एटीएम लांबवल्या प्रकरणी धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे सुरत बायपासवरील कॅन्सर हॉस्पिटलजवळ संशयित रिक्षाचालकाला अटक केली. आरोपीने दोन अनोळखी साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली देत १८ हजारांचा मोबाइल व तीन हजारांची रोकड काढून दिली.