शिरपूर : शिरपूर तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर तालुक्यातील उमर्दा गावातील एका शेतात तब्बल ५३ लाख १० हजार रुपये किमतीची गांजाची झाडे जप्त करीत रमेश लकड्या पावरा (३४, रा.उमर्दा, ता. शिरपूर) यास अटक केली. या कारवाईने गांजा शेती फ लवणाऱ्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. गांजा शेती फ लवण्याकामी लकड्या बेड्या पावरा याने मदत केल्याने त्यासही आरोपी करण्यात आले.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना उमर्दा गावाजवळील रमेश लकड्या पावरा हा गांजाची लागवड करून देखभाल करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला घेत २७ रोजी छापा टाकला. यंत्रणेने ५३ लाख १० हजार रुपये किमतीची गांजा वनस्पतीची हिरवी ओली, ताजी झाडे जप्त केली. रमेश लकड्या पावरा व लकड्या बेड्या पावरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक मिलिंद पवार करीत आहेत.
ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, शिरपूर उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे. उपनिरीक्षक मिलिंद पवार, जयराज शिंदे, शेखर बागुल, राजू ढिसले, जयेश मोरे, भूषण पाटील, मनोज नेरकर, सुनील पवार, स्वप्नील बांगर, रोहिदास पावरा, रणजित वळवी, चालक मनोज पाटील, चालक सागर कासार आदींच्या पथकाने केली.