शहादा : कार्यकर्त्यांशी बेजबाबदारपणे वागत अपमानास्पद वागणुक देणाऱ्या नंदुरबार तहसीलदारांवर कारवाई करण्यसत यावी अशी मागणी करणारे निवेदन शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांच्या नेतृत्वात निवासी उपजिल्हाधिकारी निलेश भामरे यांना देण्यात आले.
जम्मू काश्मीर राज्यात अतिरेक्यांकडून भारतीय सैन्य दलातील अधिकारी व जवानांना लक्ष केले जात असून त्यांच्यावर हल्ले केले जात आहे. यात अनेक अधिकारी व जवान शहीद झाले. या अतिरेकी हल्ल्याच्या विरोधात केंद्र शासनाने ठोस भूमिका घ्यावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात निषेध करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. केंद्र शासनाने कारवाई करावी यासाठी धरणे आंदोलन करुन तहसीलदारांना या मागणीचे निवेदन दिले जात आहे.
दि. १८ जुलै रोजी नंदुरबार तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शिवसेना नंदुरबार महानगर प्रमुख पंडित माळी यांनी तहसीलदार नितिन गरजे यांना सकाळी अवगत केले होते. मात्र प्रत्यक्ष धरणे आंदोलन तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार, लिपिक व शिपाई गैरहजर होते. तहसील कार्यालयाचे दरवाजे बंद होते. फक्त संरक्षणासाठी एक पोलिस हवालदार नियुक्त होता. शासकीय कामासाठी अथवा बैठकीसाठी तहसीलदार यांना कार्यालय सोडून जायचे होते तर त्यांनी नायब तहसीलदार अथवा कार्यालयातील लिपिकाला निवेदन स्वीकारण्याच्या सूचना करणे गरजेचे होते. मात्र निवेदन स्विकारायला कोणीच नव्हते. कार्यालय बंद ठेवून कार्यकर्त्यांचा अपमान केला आहे व त्यांना अपमानास्पद वागणूक दिली आहे. विशेष म्हणजे शिवसैनिक भारतीय जवानांबाबत सहानुभूती बाळगत त्यांच्यावरील हल्ले थांबावे त्यांच्या प्राणाचे रक्षण व्हावे यासाठी केंद्र शासनाला कठोर कारवाई करण्याची मागणी करत होतो. असे असताना तहसीलदारांनी मागणीचा व भावनेचा सन्मान न ठेवता काहीही दोष नसताना अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. आंदोलन चालत असतांना अर्ध्या तासानंतर नायब तहसीलदार रिनेश गावित यांनी निवेदन स्वीकारले.
तहसीलदार नितिन गरजे यांचे हे कृत्य अशोभनीय व अशासकीय असल्याने तसेच त्यांनी आंदोलनकर्त्यांची भूमिका समजून न घेता त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून आपण तहसीलदार नितिन गरजे यांच्यावर कठोर कारवाई करावी व आंदोलनकर्त्यांना न्याय द्यावा. येत्या आठ दिवसात तक्रारीबाबत योग्य कारवाई अथवा निर्णय न घेतल्या गेल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन व उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदनावर जिल्हाप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी, जिल्हा युवा सेना जिल्हाधिकारी अर्जुन मराठे, तालुकाप्रमुख रमेश पाटील, शहर युवा सेना प्रमुख दादा कोळी, माजी जिल्हा उपप्रमुख सुनील सोनार, उपमहा नगरप्रमुख इम्तियाज कुरेशी, उपमहा नगरप्रमुख भक्तवत्सल सोनार, उपतालुकाप्रमुख निंबा पाटील, उपतालुकाप्रमुख अमृत ठाकरे यांच्या सह्या आहेत.