---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यातील पाचोरा नगरपरिषद निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. कारण पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत भाजपविरोधात शिंदेसेना मैदानात उतरली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
जळगाव जिल्ह्यात एकूण 16 नगरपरिषद व दोन नगरपंचायतची निवडणूक जाहीर झाली. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.
पाचोरा नगरपरिषद निवडणूक शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पाचोरा नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत होत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी आज, शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी पाचोरा शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तर भाजपच्या वतीने सुनिता पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या पत्नी सुचेता वाघ यांना रिंगणात उतरवले असून भाजपच्या वतीने पाचोरा शहरात शक्ती प्रदर्शन करत शनिवारीच सुचेता वाघ यांचा उमेदवारी अर्ज हा दाखल केला. दरम्यान, या निवडणुकीत आपलाच विजय होईल, असा विश्वास आमदार किशोर पाटील व त्यांच्या पत्नी सुनीता पाटील यांनी व्यक्त केला.
दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला…
जिल्ह्यातील दिग्गज नेते मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे, गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, किशोर पाटील यांच्या परिवारातील सदस्यांनी देखील उमेदवारी अर्ज नगराध्यक्षपदासाठी आज रोजी दाखल केले आहेत. त्यामुळे या सर्व दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे पाहायला मिळत आहे.









