पालघर : पालघरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या ४ नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केली आहे. पालघर नगर परिषदेच्या एकूण चार नगरसेवकांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
यामध्ये पालघर नगरपरिषदेचे नगरसेवक उत्तम घरत, सुभाष पाटील, दिनेश घरट आणि बंड्या वडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. आणखी आठ नगरसेवक शिवसेना ठाकरे गटाला धक्का देणार असल्याची माहिती मिळत आहे.
मागील वर्षभरात पालघर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुका किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका यामध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा पराभव पत्करावा लागला होता. याच पार्श्वभूमीवर येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना शिंदे गटाने पक्ष बांधणीवर भर दिला आहे.
पालघरमधील अनेक महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचा आपल्या पक्षात प्रवेश करुन घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र फाटक, नरेश मस्के यांनी जिल्ह्यामध्ये बैठका घेण्यास सुरुवात करत पक्ष बांधणीवर भर दिला आहे.
लातूरमध्येही ठाकरे गटाला खिंडार
लातूरमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख शिवाजी माने यांच्यासह जवळपास अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला आहे.
अनेक वर्षापासून शिवाजी माने हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी शिवाजी माने यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवून जिल्हा संघटकपदी निवड करण्यात आली होती. यामुळचे शिवाजी माने हे ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती.