वाकडी, ता. चाळीसगाव : शेतात शेळ्यांसाठी चारा घेण्यास गेलेल्या १२ वर्षीय महेश अनिल सूर्यवंशी या मुलाचा शेतात तुटलेल्या वीज तारेचा धक्का लागून जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १६ रोजी सकाळी वाकडी शिवारात घडली. या मयत महेश सूर्यवंशी घटनेत मुलाचे वडीलदेखील थोडक्यात बचावले. बापाच्या डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झाल्याचा हृदय पिवळटून टाकणाऱ्या या घटनेची बातमी वाऱ्यासारखी गावात पोहोचली. योगायोगाने त्याचवेळी एका अंत्यविधीसाठी आमदार मंगेश चव्हाण हे वाकडी गावात आले होते. आमदार चव्हाण यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ क्षणाचाही विलंबना करता घटनास्थळ गाठले. घटनेचे गांभीरे ओळखून त्यांनी उपस्थित वीज वितरण कंपनी व पोलीस प्रशासन यांना सूचित करून घटनेचा पंचनामा केला.
याप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण यांनी माणुसकीचे दर्शन दाखवत, भावनाविवश होत बालकाचा मृतदेह हा चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. या घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वाकडी गाव हे आमदार यांच्या मामाचे गाव असल्याने त्यांचे या गावाशी वेगळे नाते आहे. आमदारांच्या माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने पुन्हा एकदा झाले आहे.
मयताच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत मिळवून देणार – आमदार मंगेश चव्हाण
झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून यात जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना आमदार मंगेश चव्हाण यांनी यावेळी दिल्या, महेशच्या दुर्दैवी मृत्यूने सूर्यवंशी कुटुंबावर जो दुःखाचा डोंगर कोसळला आहे, जे नुकसान झोके नुकसान न भरून निघणारे आहे. मात्र वीज वितरण कंपनी व शासनाकडून तसेच वैयक्तिक पातळीवर जास्तीत जास्त मदत मयताच्या कुटुंबियांना मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार चव्हाण यांनी दिले.