तरुण भारत लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२२ । जळगाव शहरातील महाबळ परिसरात घरातील झोक्याची दोरी गळ्यात आवळल्याने १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. झोक्यावर स्टंटबाजी करताना ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी रामानंद पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
विधी पाटील (वय १८), असे मृत तरुणीचे नाव आहे. विधी पाटील ही शहरातील महाबळ कॉलनीत पोलिस चौकीमागील गल्लीत आपल्या परिवारासोबत वास्तव्याला होती. ती एका महाविद्यालयात बारावीचे शिक्षण घेत होती. तिचे आई-वडील संगणक क्लास चालवतात. मंगळवारी (ता. २८) सायंकाळी घरात कोणीही नसताना विधी दुसऱ्या मजल्यावरील नायलॉन दोरीच्या झोक्यावर बसली होती.
झोका घेत असताना, अचानक नॉयलॉन दोरीचा विधीच्या गळ्याला फास आवळला जाऊन तिचा जीव गुदमरला. त्यावेळी घरात कुणीही नसल्याने दोरीचा गळफास लागल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या आजोबांनी तिच्या मोबाईलवर कॉल केला. मात्र, कॉल उचलत नसल्याने ते घरी आले. वरच्या मजल्यावर विधीला झोक्याचा गळफास लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
दरम्यान, रामानंदनगर ठाण्याचे पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला. विधीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. विधी एकुलती एक मुलगी असल्याने कुटुंबीयांवर संकट ओढवले आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक प्रशांत पाठक, ज्ञानेश्वर पाटील तपास करीत आहेत.