तरुण भारत लाईव्ह । २९ मार्च २०२३। कांदा विक्रीसाठी बाजारात घेवून जात असताना भीषण अपघातात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील चाळीसगाव – नांदगाव रस्त्यावरील जळगाव खुर्द गावाजवळ मध्यरात्री हा भीषण अपघात झाला.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हिंगणे – देहेरे येथून मृत शेतकरी एकनाथ सोनवणे हे नांदगाव बाजार समितीत कांदा विक्रीसाठी घेवून जात होते. कांदा विकला जावा यासाठी शेतकरी रात्रीच बाजार समितीत नंबर लावण्यासाठी जात असतात, त्यामुळे ते रात्रीच बाजार समितीत कांदा घेवून निघाले होते. यावेळी नांदगाव रस्त्यावरील जळगाव खुर्द गावाजवळ चाळीसगाव कडून येणाऱ्या मालवाहू पिकअपने पाठीमागून सोनवणे यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये एकनाथ सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अज्ञात पीकअप चालकाविरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.