जळगाव : चोपडा तालुक्यातील अडावद येथील रहिवाशी शेतकऱ्याचा अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाजवळील पीर पाखर बाबा दर्गाजवळ मृतदेह आढळून आला. जगदीश फिंगऱ्या बारेला (वय ४०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याला मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, रविवारी पहाटे जगदीश बारेला या शेतकऱ्याचा मृतदेह अंकलेश्वर – बऱ्हाणपूर महार्गावरील पैज पाखर बाबा दर्गाजवळ आढळून आला. त्याच्या मृतदेहाजवळ एक मोटार सायकल मिळाली असून तीचा क्रमांक एमपी ४६, एमएल ६८८९ असा आहे. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाचा पंचनामा केला. यावेळी श्वान पथकासह ठसे तज्ञ सहायक पोलीस निरीक्षक फड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे हेही उपस्थित होते. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.