Nandurbar Crime News : कौटुंबिक वादातून अल्पवयीन नातवाने आजोबाचा खून केल्याची घटना शहादा शहरात घडली. या घटनेमुळे शहरात एकाच खळबळ उडाली आहे. रात्री शतपावली करण्यासाठी गेले असता नातवाने आजोबांच्या मानेवर चाकूने वार करत गंभीर जखमी केले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात घेऊन असतानाच मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहादा – शिरूड रस्तालगत तापी रेसिडेन्सी रहिवासी निवास वसाहतीमधील रहिवाशी दशरथ शंकर राजे (60) हे रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे शतपावलीसाठी घराबाहेर पडले. यावेळी दशरथ राजे यांचा अल्पवयीन नातू आणि एक युवक दुचाकीवर त्यांच्या जवळ आले. नातवाने दशरथ राजे यांच्या गळ्यावर धारेधार चाकूने सपासप दोन-तीन वार करीत तेथून पसार झाला . घटनेची माहिती मिळताच दशरथ राजे यांचा मुलगा राहुल राजे व इतर नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांना उपचारासाठी खासगी वाहनातून रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना गंभीर जखम झाल्याने त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला. राजे कुटुंबाचे नातेवाईक शहरातील जुना प्रकाशा रोड लगत मिरा नगर भागात राहतात. त्यांचे अनेक दिवसांपासून कौटुंबिक वादविवाद सुरु होते.
याप्रकरणाची माहिती मिळताच शहादा पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी राजे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. या खुनाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक हे पुढील तपास करत आहेत.
चार तासात संशयित गजाआड
या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत अवघ्या चार तासात अल्पवयीन नातवासह एक अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतापसिंह राजपूत यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक करीत आहेत.