जळगाव : जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण आणि आरोग्य विभाग यांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात 1 हजार 700 बालके तीव्र कुपोषित आढळून आली आहेत. गत महिन्यातील सर्वेक्षणात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात एकट्या चाळीसगाव तालुक्यात 241, तर चोपडा तालुक्यात 162 बालके तीव्र कुपोषित आढळून आली आहेत. या दोन्ही तालुक्यात सर्वाधिक कुपोषित बालकांची संख्या आहे.
जिल्ह्यात यावल तालुक्यात 157 तर पारोळा तालुक्यात 134, पाचोरा 125,, भडगाव 113, धरणगाव 109 बालके कुपोषित असल्याचे सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. उर्वरित तालुक्यात शंभरच्या खाली कुपोषित बालकांची संख्या आहे. जिल्हाभरात मध्यम कुपोषित बालकांची संख्या 7 हजार आहे. त्यामुळे जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी विशेष योजना राबविण्याशिवाय पर्याय नाही. कुपोषणाचे जिल्ह्यातील प्रमाण कमी व्हावे, यासाठी विविध उपाययोजना शासनस्तरावरून राबविल्या जात आहेत. मात्र तरीही कुपोषित बालकांची संख्या अूजनही कमी झालेली नाही.
जिल्ह्यातील कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्यांना सकस पोषणयुक्त आहार पुरविण्यासाठी उपायोजना केल्या जात आहेत. तसेच ही बालके सदृढ कसे होतील त्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार उपक्रम राबविले जात आहेत.
देवेंद्र राऊत, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जि.प.,जळगाव