अकोला : बदलापूर, ठाण्यातील दोन शाळकरी मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेनंतर आता अकोल्यातूनही अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एका शाळेतील शिक्षकाविरुद्ध सहा मुलींच्या विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. शाळकरी विद्यार्थिनींनी शिक्षकावर गंभीर आरोप केले. शाळेतील शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
प्रमोद मनोहर सरदार असे आरोपी शिक्षकाचे नाव असून तो काजीखेड येथील जिल्हा परिषद शाळेत शिकवायचा. आरोपी शिक्षकावर आठवीच्या विद्यार्थिनींना बळजबरीने पॉर्न फिल्म दाखविण्याचा आणि त्यानंतर विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्षकाविरुद्ध पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 ऑगस्ट रोजी पीडित मुलींचे जबाब घेण्यात आले.
अकोला एसपी बच्चन सिंह यांनी सांगितले की, 20 ऑगस्ट रोजी आम्हाला बालकल्याण समितीचे सदस्य मनोज जयस्वाल यांची तक्रार प्राप्त झाली. यामध्ये काजीखेड येथील जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक प्रमोद सरदार याने 6 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची माहिती देण्यात आली. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पीडितेच्या तक्रारीवरून, कलम 292/24, BNS आणि POCSO च्या कलम 74,75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास महिला निरीक्षक करीत आहेत.