Panna Tiger Reserve : मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या आवारात सोमवारी सकाळी चारा तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांवर वाघाने हल्ला चढविला आहे. या हल्ल्यात चारपैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास हिनौता गावातील फुलिया साहू अन्य तीन महिलांसह नेहमीप्रमाणे पन्ना व्याघ्र प्रकल्पात चार गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना समोर अचानक तीन वाघ दिसले. त्यांना बघून चौघींनी तिथून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, फुलिया साहू ही महिला वाघाच्या तावडीत सापडली. तेथून पळ काढलेल्या महिलांनी घटनेची माहिती गावकऱ्यांना आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ हत्तीच्या साहायाने महिलेचा मृतदेह शोधून काढला.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पन्ना व्याघ्र प्रकल्पात वाघाने माणसावर हल्ला करण्याची ही पहिलीच घटना आहे. हत्तींच्या मदतीने महिलेचा मृतदेह वाघापासून वाचवण्यात आला आहे. 652 वाघिणीच्या पिल्लांनी हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. यात वाघांनी महिलेचे डोके आणि तिचे दोन्ही हात व पाय खाऊन टाकले होते.
मृत्यूच्या या घटनेनंतर व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या हिनौता गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.