शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या दुकानाला कुलूप ! नाथन अँडरसन यांची सोशल मीडिया एक्सवर पोस्ट

अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्गने आता त्यांची कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नाथन अँडरसन यांनी कंपनी बंद करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. ही तीच कंपनी आहे ज्याच्या अहवालाने जगभरात खळबळ उडाली आणि गौतम अदानी ग्रुपला मोठे नुकसान झाले होते. नाथन अँडरसन यांनी सोशल मीडिया एक्सवर एक भावनिक पोस्ट पोस्ट करून कंपनी बंद करण्याची घोषणा केली आहे.

अदानी ग्रुपला मोठे नुकसान करणाऱ्या अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडेनबर्ग रिसर्चचे संस्थापक नाथन अँडरसन यांनी एक्सवरील भावनिक पोस्टद्वारे त्यांचा प्रवास, संघर्ष आणि यश याबद्दल सांगितले. अँडरसन यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्ही ज्या कल्पनांवर काम करत होतो ते पूर्ण केल्यानंतर ते बंद करण्याची योजना होती. म्हणून आज तो दिवस आला आहे.”

अदानीसह या दिग्गजांना हादरवून टाकले

२०१७ मध्ये हिंडेनबर्गची स्थापना झाल्यापासून, या संशोधन संस्थेने उद्योगातील फसवणूक, भ्रष्टाचार आणि गैरव्यवस्थापन उघड करण्यासाठी नाव कमावले आहे. त्यांच्या कामगिरीचे वर्णन करताना अँडरसन यांनी लिहिले की त्यांच्या कंपनीने काही मोठ्या साम्राज्यांना हादरवून टाकले जे त्यांना हादरवून टाकण्याची गरज वाटली. हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी आणि ब्लॉक इंकसह अनेक अब्जाधीशांना चांगलाच फटका बसला होतं . २०२३ मध्ये, हिंडेनबर्गने गौतम अदानी यांच्या अदानी समूहावर फसवणुकीचा आरोप करणारा एक अहवाल प्रकाशित केला, ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी त्यावेळी जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती होते. परंतु अहवाल बाहेर आल्यानंतर, त्या वर्षी गौतम अदानी यांना ९९ अब्ज डॉलर्सचा धक्का बसला. तर, त्यांच्या सार्वजनिकरित्या व्यापार करणाऱ्या कंपन्यांनी १७३ अब्ज डॉलर्सचे मार्केट कॅप गमावले होते.

अदानी समूहाचे सीएफओ जुगेशिंदर रॉबी काय म्हणाले?

हिंडेनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहासह संपूर्ण जगात खळबळ उडाली. या अहवालामुळे गौतम अदानी समूहाला मोठे नुकसान सहन करावे लागले. खरं तर, अदानी समूहाचे सीएफओ जुगेशिंदर रॉबी सिंग यांनी त्यांच्या सोशल मीडिया एक्सवर लिहिले की ‘किती गाझी आले, किती गाझी गेले’. यानंतर, सोशल मीडियावर कमेंट्सचा पूर आला. अदानी ग्रुपच्या सीएफओच्या या टोमण्यावरून स्पष्ट होते की हिंडेनबर्ग बंद झाल्याने ग्रुप खूप आनंदी आहे.